Vegetarian City: गुजरातच्या पालीताना शहराने जगातलं पहिलं 'शाकाहारी शहर' होण्याचा मान मिळवला आहे. या शहरात मांसाहार तर सोडाच, पण साधं अंडं विकण्यावरही कायद्याने बंदी आहे आणि तसं केल्यास तुरुंगवास होऊ शकतो. जाणून घेऊया या शहराची खास गोष्ट.
भारतात वाराणसी, ऋषिकेश, तिरुपती अशी अनेक पवित्र तीर्थक्षेत्रं आहेत. या शहरांमध्ये मंदिरांच्या आसपास शाकाहारी हॉटेल्स, पवित्र रस्ते आणि परंपरा आपण पाहतो. पण गुजरातच्या या छोट्या शहराने एक पाऊल पुढे टाकलं. इथे मांसाहार खाण्यावर आणि विकण्यावर पूर्णपणे कायदेशीर बंदी आहे. फक्त चिकन-मटणच नाही, तर इथे एक अंडं विकताना जरी कोणी सापडलं, तरी त्याला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.
25
जगातलं पहिलं 'नॉन-व्हेज फ्री' शहर
गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात पालीताना नावाचं एक छोटंसं शहर आहे. हे शहर अहमदाबादपासून साधारण 214 किलोमीटर अंतरावर आहे. शत्रुंजय पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं हे शहर जैन धर्मीयांचं एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या पर्वतांवर 900 पेक्षा जास्त जैन मंदिरं आहेत. 2014 साली पालीतानाने एक नवा इतिहास घडवला. मांस, मासे आणि अंडी यांच्या विक्रीवर आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालणारं हे जगातलं पहिलं शहर ठरलं.
35
200 जैन साधूंचा लढा
या बंदीमागे एक मोठी कहाणी आहे. 2014 मध्ये, पालीताना शहरातील सुमारे 200 जैन साधूंनी एक मोठं आंदोलन सुरू केलं. शहरात आणि आसपास सुरू असलेली जवळपास 250 खाटकांची दुकानं सरकारने तात्काळ बंद करावीत, अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनाने देशभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं, ज्यामुळे स्थानिक प्रशासन आणि सरकारवर प्रचंड दबाव वाढला.
जैन साधूंच्या मोठ्या आंदोलनानंतर गुजरात सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. पालीताना शहराच्या हद्दीत प्राणीहत्या, मांस आणि अंडी विक्रीवर पूर्णपणे बंदी घालणारा कायदा सरकारने मंजूर केला. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे या शहरात अंडं विकणं हा केवळ गुन्हा नाही, तर तुरुंगवास होण्याइतका मोठा अपराध आहे. जैन धर्मात 'अहिंसे'ला सर्वोच्च स्थान आहे आणि त्यांच्या 2500 वर्षांच्या जुन्या सिद्धांताला या कायद्यामुळे अधिकृत मान्यता मिळाली.
55
रातोरात बदललं चित्र, पण वाद कायम
या बंदीनंतर पालीताना शहराचं चित्रच पालटलं. भाविक आणि पर्यटकांसाठी शेकडो शाकाहारी रेस्टॉरंट्स उघडली गेली. गुजराती थाळी, स्नॅक्स आणि मिठाई प्रत्येक मेन्यूचा भाग बनली. जे व्यावसायिक आधी मांसाहार विकत होते, त्यांनी शाकाहारी व्यवसायात प्रवेश केला, तर काहींनी शहर सोडलं. मात्र, या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं नाही. खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा निर्णय आहे, असं म्हणत काहींनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. स्थानिक मुस्लिम आणि इतर समाजातील लोकांनी आपल्या रोजगारावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली. त्यामुळे धार्मिक श्रद्धा विरुद्ध वैयक्तिक स्वातंत्र्य हा वाद आजही सुरू आहे.