
लंडन (०८ सप्टेंबर): यूकेच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सिस्टीममध्ये अचानक एक मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे संपूर्ण यूकेमधील विमानसेवा विस्कळीत झाली असून, आतापर्यंत सुमारे ३०० विमानं रद्द करण्यात आली आहेत. या अनपेक्षित संकटामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले आहेत आणि त्यांच्यात संतापाचं वातावरण आहे.
ब्रिटनच्या नॅशनल एअर ट्रॅफिक सर्व्हिसेस (NATS) ने या समस्येची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की, 'आम्ही या तांत्रिक समस्येवर मात करण्यासाठी वेगाने काम करत आहोत.' मात्र, ही समस्या नेमकी कशामुळे आली आणि ती कधीपर्यंत सुटेल, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
'फ्लाईट रडार २४' या विमान उड्डाणांवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या बिघाडाचा फटका अनेक मोठ्या एअरलाईन्सला बसला आहे. यामध्ये ब्रिटिश एअरवेज, ईझीजेट, केएलएम आणि लुफ्तान्सा यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. विमानं रद्द झाल्यामुळे यूकेमधील प्रमुख विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक प्रवासी माहितीअभावी विमानतळावरच अडकून पडले आहेत.
लंडनचं हिथ्रो, स्टॅनस्टेड आणि सिटी एअरपोर्ट या विमानतळांवर परिस्थिती सर्वात गंभीर आहे. याशिवाय मँचेस्टर आणि बर्मिंगहॅमसह यूकेमधील जवळपास सर्वच विमानतळांवर कमी-अधिक प्रमाणात गोंधळाची स्थिती आहे. अधिकाऱ्यांनी प्रवाशांना आवाहन केलं आहे की, विमानतळावर येण्यापूर्वी आपल्या एअरलाईन कंपनीशी संपर्क साधून फ्लाईटचं स्टेटस नक्की तपासा.
अनेक एअरलाईन्स कंपन्यांनी प्रवाशांना 'सिस्टीम फेल' झाल्याचं कारण दिलं आहे, पण काही कंपन्यांकडून कोणतीही माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ आणखी वाढला आहे. अचानक झालेल्या या तांत्रिक बिघाडामागे काही वेगळं कारण आहे का, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. सध्या प्रवासी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत असून, अधिकारी या समस्येच्या मूळ कारणाचा शोध घेत आहेत.