
दक्षिण कोरियामध्ये रिसर्च करणाऱ्या एका भारतीय तरुणीसोबत एक भारी किस्सा घडला. ती तिच्या कोरियन मित्राच्या लग्नाला गेली होती, पण तिथे तिला एका विचित्र नियमामुळे जेवायलाच बंदी घातली गेली. 'jigyasa__.jd' नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या तरुणीने कोरियन लग्नातील हा वेगळा अनुभव शेअर केला आहे.
ही तरुणी तिच्या कोरियन सहकाऱ्याच्या लग्नासाठी भारत आणि श्रीलंकेतील दोन सिनियर सहकाऱ्यांसोबत पोहोचली होती. लग्नाच्या ठिकाणी ते वेळेवर पोहोचले. नवरी-नवरदेवाला आहेर म्हणून पैसे किंवा गिफ्ट देण्याची पद्धत असते, हे त्यांना माहीत होतं. पण लग्नाला थोडा वेळ असल्याने ते बाहेर गेले. मित्राचा मेसेज आल्यावर ते परत हॉलमध्ये आले.
जवळपास एका तासातच लग्नाचे सर्व विधी संपले. त्यानंतर पाहुणे जेवणासाठी दुसऱ्या हॉलकडे निघाले, तेव्हा हे तिघेही त्यांच्यासोबत गेले. पण जेवणाच्या हॉलच्या दारातच त्यांना एका अनपेक्षित अडथळ्याला सामोरं जावं लागलं.
आहेर देण्यासाठी आणलेलं पाकीट त्यांच्याकडेच होतं. ते नंतर थेट नवरी-नवरदेवाला देऊ, असा त्यांचा विचार होता. पण जेव्हा त्यांनी डायनिंग हॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथल्या सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवलं आणि आत जाण्यासाठी 'टोकन' दाखवायला सांगितलं.
आता अडचण अशी झाली की, सिक्युरिटी गार्डला इंग्रजी येत नव्हतं आणि यांना कोरियन भाषा. त्यामुळे नेमकं काय चाललंय हेच कळेना. शेवटी त्यांनी थेट नवरदेवालाच फोन लावला आणि मदतीसाठी बोलावलं. तेव्हा त्यांना कोरियातील त्या विचित्र नियमाबद्दल समजलं.
कोरियन लग्नांमध्ये एक वेगळी पद्धत आहे. लग्नाच्या हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बाहेर एक काऊंटर असतो. तिथे आधी आहेर किंवा पैसे असलेलं पाकीट द्यावं लागतं. या बदल्यात तिथून एक 'फूड टोकन' मिळतं. हे टोकन दाखवल्याशिवाय जेवणाच्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही, असं त्यांच्या मित्रानं समजावून सांगितलं.
आपल्याकडे कसं आहेर थेट नवरी-नवरदेवाच्या हातात देतात आणि जेवणासाठी अशी कोणतीही अट नसते. पण कोरियात मात्र 'आधी आहेर, मग जेवण' असा नियम आहे. नंतर नवरदेवाने येऊन कर्मचाऱ्यांशी बोलल्यावर त्यांना डायनिंग हॉलमध्ये प्रवेश मिळाला. त्यांनी आहेराचं पाकीट दिलं आणि जेवणाचा आनंद घेतला.
भारतातील लग्नांपेक्षा हा अनुभव खूपच वेगळा आणि आश्चर्यकारक होता, असं या तरुणीने म्हटलं आहे. हा विचित्र अनुभव इतरांनाही कळावा, यासाठी तिने तो सोशल मीडियावर शेअर केला.