
Philippines Earthquake : फिलीपाईन्समध्ये मंगळवारी रात्री झालेल्या शक्तिशाली भूकंपाने मोठा कहर उडवला. 6.9 तीव्रतेच्या या धक्क्यामुळे किमान 26 जणांचा मृत्यू झाला असून 147 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती संस्थेने (NDRRMC) याबाबत माहिती दिली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
स्थानिक वेळेनुसार रात्री 9.50 वाजता सेबूच्या उत्तर किनाऱ्यावर भूकंप झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, केंद्रबिंदू बोगो सिटीच्या ईशान्येस 19 किलोमीटर अंतरावर आणि 10 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपानंतर इमारती कोसळल्या, भूस्खलन झाले आणि अनेक भाग अंधारात बुडाले. सुरुवातीला सुनामीचा इशारा देण्यात आला होता, मात्र नंतर तो मागे घेण्यात आला.
या भूकंपात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही लोक अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सॅन रेमिजिओ येथे क्रीडा केंद्राचे छत कोसळून तटरक्षक दलातील तीन जवानांचा मृत्यू झाला. बोगो येथे भूस्खलन आणि ढिगाऱ्याखाली नऊ प्रौढ व चार मुलांचा बळी गेला आहे.
राष्ट्रीय आपत्ती परिषदेच्या (NDRRMC) ताज्या अहवालानुसार, एकूण 22 इमारतींना गंभीर नुकसान झाले आहे. बाधित भागात बचाव आणि मदत पथके तैनात करण्यात आली आहेत. रात्रीच्या अंधारामुळे व भूकंपानंतरच्या धक्क्यांमुळे मदतकार्यात अडथळा येत आहे. फिलीपिन्स ज्वालामुखी व भूकंपशास्त्र संस्थेच्या मते, आतापर्यंत या प्रदेशाला तब्बल 379 भूकंपाचे धक्के बसले आहेत.
सेबूच्या गव्हर्नर पामेला बॅरिक्युआट्रो यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि नुकसानग्रस्त इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पॅसिफिक “रिंग ऑफ फायर” वर वसलेले असल्याने फिलीपाईन्समध्ये भूकंप वारंवार होतात आणि त्यांचे परिणाम प्राणघातक ठरतात.