
Pakistan-Afghanistan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सशस्त्र संघर्षाने पुन्हा उग्र रूप धारण केले आहे. मागच्या आठवड्यात पाकिस्तानने काबूलमधील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. 8 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या संघर्षानंतर बुधवारी संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये सीजफायरवर एकमत झालं होतं. मात्र, शुक्रवारी रात्री पाकिस्तानने या तहाचं उल्लंघन करत अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला.
पाकिस्तानच्या सैन्याने अफगाणिस्तानातील पक्तिका प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक निवासी घरे उद्ध्वस्त झाली. या हल्ल्यात तीन स्थानिक क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला असून चार खेळाडू जखमी झाले आहेत. मृतांमध्ये कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून या युवा क्रिकेटर्सचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू स्थानिक क्रिकेट स्पर्धा खेळून परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
देशातील क्रिकेटपटूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत होणारी तिरंगी मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्राय सीरिज 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. बोर्डाच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत असून क्रिकेटपटूंनीही या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फजलहक फारूकी यांनी एक्सवर (Twitter) पोस्ट करून या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी म्हटलं, “आमच्या निरपराध नागरिकांचा आणि खेळाडूंचा नरसंहार हा गंभीर अपराध आहे. हा सन्मान नाही, तर घोर अपमान आहे. अफगाणिस्तान अमर राहो!”
अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले, “या हवाई हल्ल्याने आमच्या नागरिकांसोबत अनेक युवा क्रिकेटपटूंनाही प्राण गमवावे लागले. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत न खेळण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. राष्ट्रीय सन्मान आणि स्वाभिमान सर्वात वरचं आहे.”