
मुंबई : भारतातील तुरुंगात असलेला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह गोल्डी बरार यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील तपास यंत्रणांकडून संयुक्तपणे 'ऑपरेशन हार्ड बॉल' राबण्यात आले आहे. या कारवाईअंतर्गत भारताशी संबंधित संघटित गुन्हेगारी नेटवर्कविरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईनंतर अमेरिकेतील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येच्या कटाशी संबंधित गंभीर आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे.
अमेरिकेतील शासकीय न्यायालयीन कागदपत्रांनुसार, 18 जून 2023 रोजी कॅनडातील सरे शहरात गुरुद्वाराबाहेर झालेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर यांची हत्या झाली. यांच्या हत्येच्या कटात लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बरार यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार, तुरुंगातून आणि परदेशातून या हत्येचे नियोजन करण्यात आले होते. लॉरेन्स आणि गोल्डी यांच्या सूचनेनुसार हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निज्जर यांची हत्या केली. या आरोपांवर अद्याप न्यायालयाचा अंतिम निर्णय झालेला नाही.
अमेरिकेतील एफबीआय (FBI) ने गोल्डी बरारचा शोध घेण्यासाठी 50 हजार अमेरिकी डॉलर्स (सुमारे 42 लाख रुपये) बक्षिसाची घोषणा केली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, गोल्डी बराj अमेरिकेत लपून बसला आहे. येथूनच गोल्डी बरार उत्तर अमेरिकेतील गुन्हेगारी नेटवर्क चालवत असल्याचा संशय आहे.
'ऑपरेशन हार्ड बॉल' ही केवळ एका देशाची कारवाई नसून अमेरिका (FBI), कॅनडाची RCMP आणि युरोपमधील तपास यंत्रणांकडून संयुक्तपणे राबवली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या संस्था भारताशी संबंधित संघटित गुन्हेगारी गटांवर लक्ष ठेवून होत्या. अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी, शस्त्रांची तस्करी आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कारवायांवर आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
या संयुक्त कारवाईत तीन स्वतंत्र आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. यामध्ये एकूण 37 आरोपींचा समावेश आहे. यापैकी 24 जणांना अटक करण्यात आली आहे. अमेरिकेत 13 जण, त्यापैकी 11 जणांना कॅलिफोर्नियामध्ये अटक करण्यात आली आहे. कॅनडामध्ये 3, स्पेनमध्ये 1 जणाला अटक करण्यात आली आहे. 7 आरोपी आधीपासूनच तुरुंगात आहेत. याशिवाय 10 संशयितांचा शोध सुरू आहे. यापैकी 7 अमेरिका, 2 भारत आणि 1 युरोपमध्ये असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात कोकेनसह अंमली पदार्थ आणि अवैध शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हे नेटवर्क केवळ भारत किंवा कॅनडापुरते मर्यादित नाही. तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ब्रिटन, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपर्यंत त्याचे जाळे पसरले आहे. या प्रकरणात पंजाबमधील गँगस्टर जग्गू भगवानपुरिया आणि रविंदर सिंह धांडा यांची नावेही समोर आली आहेत. या नेटवर्कवर अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी आणि इतर संघटित गुन्हेगारी कारवायांचे आरोप आहेत.
वर्ष 2023 मध्ये हरदीप सिंह निज्जर यांची हत्या झाली. यांच्या हत्येनंतर तत्कालीन कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारत सरकारच्या एजंटांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. यामुळे दोन्ही देशांतील राजकीय संबंध बिघडले गेले. सध्याच्या अमेरिकन आणि कॅनडातील तपास यंत्रणांनी संघटित गुन्हेगारी नेटवर्कवर लक्ष केंद्रित केले आहे. या कारवाईमुळे भारत आणि कॅनडामधील संबंध सुधारण्यास मदत होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपांचा अंतिम निकाल न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.