
मुंबई : मोबाईल युजर्ससाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्या पुढाकारानंतर टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) नवे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार, आता मोबाईल युजर्ससाठी ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीचे रिचार्ज प्लॅन आणि फक्त कॉलिंग (व्हॉइस) सेवा वापरणाऱ्यांसाठी स्वस्त प्लॅन उपलब्ध करून दिले जातील.
आतापर्यंत अनेक टेलिकॉम कंपन्यांचे लोकप्रिय प्रीपेड प्लॅन २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह यायचे. पण नव्या नियमांमुळे आता ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लॅनही मिळतील. यामुळे ग्राहकांना १२ महिन्यांत फक्त १२ वेळाच रिचार्ज करण्याची सोय मिळणार आहे.
जे ग्राहक मोबाईल डेटा वापरत नाहीत, त्यांच्यासाठी कमी खर्चाचे प्रीपेड 'व्हॉइस-ओन्ली' प्लॅन सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या प्लॅनमध्ये फक्त इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलिंगची सुविधा असेल. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि कमी बजेट असलेल्या ग्राहकांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ज्यांना इंटरनेटची गरज नाही, त्यांना फक्त कॉलिंगसाठी कमी पैशात चांगला पर्याय मिळेल. ट्रायने २२ सप्टेंबर २०२६ रोजी 'Telecom Consumer Protection (Thirteenth Amendment) Regulations, 2026' जारी केले. या नव्या नियमानुसार Jio, Airtel, Vi आणि BSNL या सर्व कंपन्यांना ३० दिवसांचे रिचार्ज प्लॅन आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नेमका काय बदल होणार?
आतापर्यंत बहुतांश 'मंथली' प्लॅन हे प्रत्यक्षात २८ दिवसांचे असायचे. याचा अर्थ ३६५ दिवसांच्या वर्षात तुम्हाला १३ वेळा रिचार्ज करावा लागायचा (२८x१३=३६४ दिवस). पण नव्या नियमानुसार ३० दिवसांचा प्लॅन आल्यास, वर्षातून फक्त १२ वेळा रिचार्ज केला तरी चालेल. यामुळे तुमच्या एका महिन्याच्या रिचार्जचे पैसे वाचतील.
ट्रायने (TRAI) आणखी दोन मोठे निर्णय घेतले आहेत:
१. एकाच तारखेला रिचार्ज: कंपन्यांना आता असे प्लॅन आणावे लागतील जे दर महिन्याला एकाच तारखेला रिन्यू होतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही ५ तारखेला रिचार्ज केला, तर पुढच्या महिन्यातही तो ५ तारखेलाच रिन्यू होईल. जर फेब्रुवारी महिन्यात ३० किंवा ३१ तारीख नसेल, तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो रिन्यू होईल.
२. फक्त कॉलिंग आणि SMS प्लॅन: अनेक ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील युजर्स किंवा ज्यांना दुसरं सिम फक्त कॉल रिसिव्ह करण्यासाठी लागतं, त्यांना डेटाची गरज नसते. तरीही नाईलाजाने त्यांना डेटा असलेले महागडे प्लॅन घ्यावे लागायचे. नव्या नियमानुसार, कंपन्यांना आता ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी मुदतीच्या डेटा प्लॅनसोबतच फक्त Voice + SMS चे स्वस्त प्लॅनही आणावे लागतील.
मग २८ दिवसांचे प्लॅन पूर्णपणे बंद होणार का?
नाही, ट्रायने २८ दिवसांचे प्लॅन बॅन केलेले नाहीत. कंपन्या त्यांचे २८ दिवसांचे प्लॅन चालू ठेवू शकतात, पण त्यासोबतच त्यांना ३० दिवसांचा आणि 'व्हॉइस-ओन्ली' प्लॅनचा पर्याय देणं बंधनकारक असेल. कोणता प्लॅन निवडायचा, हे पूर्णपणे ग्राहकांच्या हातात असेल.
राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता आणि आता त्यांनी या नव्या नियमांचे स्वागत केले आहे. सामान्य प्रीपेड ग्राहकांसाठी हा एक मोठा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येत्या काही आठवड्यांतच Jio, Airtel आणि Vi त्यांचे नवे ३० दिवसांचे प्लॅन जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.