TRAI Recharge Plans : नो डेटा... ओन्ली कॉल्स! ट्राय आणतंय नवे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स

Published : Sep 28, 2026, 03:21 PM IST
TRAI Recharge Plans : नो डेटा... ओन्ली कॉल्स! ट्राय आणतंय नवे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स

सार

ज्यांना इंटरनेटची गरज नाही, अशा ग्राहकांसाठी आता फक्त कॉलिंग आणि एसएमएसचे नवे रिचार्ज प्लॅन्स आणण्याचे आदेश ट्रायने (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत.

मुंबई : मोबाईलचा वापर फक्त बोलण्यासाठी आणि मेसेज करण्यासाठी करणाऱ्यांसाठी एक भारी बातमी आहे. ज्यांना इंटरनेट डेटाची अजिबात गरज नसते, अशा ग्राहकांसाठी फक्त व्हॉइस कॉल आणि एसएमएस सुविधा असलेले नवे रिचार्ज प्लॅन्स आणण्याचे आदेश भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत.

30 दिवसांची व्हॅलिडिटी

2026 च्या टेलिकॉम ग्राहक संरक्षण 13 व्या दुरुस्ती नियमांनुसार, टेलिकॉम कंपन्यांना आता 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीचे स्पेशल व्हॉइस आणि एसएमएस वाउचर्स देणं बंधनकारक असणार आहे. यात डेटा सुविधा नसल्यामुळे त्याचे दरही कमी असावेत, अशा सूचना ट्रायने दिल्या आहेत. यामुळे जे लोक इंटरनेट वापरत नाहीत, त्यांचे डेटासाठी जाणारे जास्तीचे पैसे वाचतील.

दर महिन्याला एकाच तारखेला रिचार्ज

सर्व टेलिकॉम कंपन्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त व्हॅलिडिटी असलेला किमान एक तरी व्हॉइस आणि एसएमएस प्लॅन द्यावाच लागेल. हे प्लॅन्स दर महिन्याला त्याच तारखेला रिन्यू होतील असे असावेत. जर एखाद्या महिन्यात ती तारीख नसेल, तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी प्लॅन रिन्यू होईल. उदाहरणार्थ, जर एखादा प्लॅन दर महिन्याच्या 31 तारखेला रिन्यू होणार असेल, आणि त्या महिन्यात 31 दिवस नसतील, तर तो प्लॅन त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी रिन्यू होईल.

सध्या लॉंग टर्म प्लॅन्सचाच सुळसुळाट

सध्या टेलिकॉम कंपन्या जे व्हॉइस आणि एसएमएस प्लॅन्स देतात, ते बहुतांश लॉंग टर्म व्हॅलिडिटीचे असतात, याकडे ट्रायने लक्ष वेधलं आहे. म्हणजेच हे प्लॅन्स 80, 84, 336 किंवा 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळतात. त्यामुळे ज्यांना कमी दिवसांसाठी रिचार्ज करायचा आहे, त्यांच्याकडे जास्त पर्याय नसतात. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या लोकांना त्यांच्या बजेटनुसार शॉर्ट टर्म रिचार्ज करण्यासाठी या नव्या नियमाचा मोठा फायदा होईल, असं ट्रायचं म्हणणं आहे.

सध्याचे रिचार्जचे दर

सध्या जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vi) या कंपन्या फक्त व्हॉइस आणि एसएमएस असलेले रिचार्ज प्लॅन्स देतात. जिओचा 3 महिन्यांचा प्लॅन 448 रुपयांना, तर वार्षिक प्लॅन 1748 रुपयांना मिळतो. एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे वार्षिक प्लॅन्स 1849 रुपयांना आहेत. तर त्यांचे 3 महिन्यांचे प्लॅन्स अनुक्रमे 469 आणि 470 रुपयांना मिळतात.

नव्या प्लॅन्सची किंमत काय असेल?

ट्रायच्या या नव्या आदेशामुळे, सध्याच्या लॉंग टर्म प्लॅन्ससोबतच कमी व्हॅलिडिटीचे अनेक नवे रिचार्ज ऑप्शन्स ग्राहकांना मिळतील. पण, या नव्या प्लॅन्सचे नेमके दर काय असतील, हे टेलिकॉम कंपन्यांनी अद्याप जाहीर केलेलं नाही. ज्यांना डेटाची गरज नाही, अशा ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार आणि बजेटनुसार रिचार्ज करण्यासाठी ही नवी सिस्टीम खूप सोयीची ठरेल, अशी अपेक्षा आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Aadhaar Card KYC : आधार कार्डधारकांसाठी गुड न्यूज, आता टेन्शन घेण्याची गरज नाही! वाचा नक्की काय आहे अपडेट
iPhone 17 Price Drop : फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन 17 आणि 15 वर बंपर डिस्काउंट!