Retirement Planning: निवृत्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपले सक्रिय व्यावसायिक आयुष्य, नोकरी किंवा कामावरून स्वेच्छेने किंवा वयानुसार बाजूला होणे. हे सहसा वृद्धत्व किंवा आरोग्याच्या कारणास्तव निवडले जाते, जिथे कामाचा भार कमी केला जातो किंवा पूर्णपणे थांबवला जातो. यामध्ये पेन्शन आणि आर्थिक नियोजनाचे महत्त्व असते. सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पुरेसा निधी (Corpus) जमा करणे, महागाईचा विचार करून गुंतवणूक करणे आवश्यक असते.
रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी किती पैसे लागतील? हा प्रश्न तुम्ही दहा लोकांना विचारला, तर दहा वेगवेगळी उत्तरं मिळतील. कुणी म्हणेल एक कोटी पुरेसे आहेत, तर कुणी म्हणेल की किमान दहा कोटी तरी हवेतच. पण खरं उत्तर या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे. एक ठराविक रक्कम सांगण्यापेक्षा, तुमची जीवनशैली कशी आहे यावर सगळं काही अवलंबून आहे.
रिटायरमेंटचं प्लॅनिंग करताना सगळ्यात आधी एका मोठ्या रकमेचा विचार करू नका, तर पगार बंद झाल्यावर दर महिन्याला तुम्हाला किती खर्च येईल याचा विचार करा. नोकरीतून निवृत्त झाल्यावर कदाचित तुमच्या घराचं कर्ज फिटलेलं असेल, मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिलेली असतील. हे जरी दिलासादायक असलं तरी, काही खर्च याच काळात वाढतात. विशेषतः आरोग्यावरील खर्च, प्रवास आणि मनोरंजनासाठी लागणारा पैसा वाढतो. तुमच्या सध्याच्या मासिक खर्चाच्या किती टक्के रक्कम रिटायरमेंटनंतर लागेल, याचा अंदाज आधीच बांधायला हवा. पण आज तुम्हाला जी रक्कम योग्य वाटते, ती दहा-पंधरा वर्षांनी पुरेशी नसेल हे अनेकजण विसरतात.
अनेकांची गणितं चुकवणारा एक मोठा व्हिलन आहे - 'महागाई'. भारतात महागाईचा दर साधारणपणे 4 ते 7 टक्क्यांपर्यंत असतो. हे ऐकायला कमी वाटत असलं, तरी 2--25 वर्षांनंतर तुमचा खर्च अनेक पटींनी वाढवतो. उदाहरणार्थ, आज ज्या व्यक्तीचा महिन्याचा खर्च 50,000 रुपये आहे, त्याला 20 वर्षांनंतर तीच जीवनशैली टिकवण्यासाठी महिन्याला 2 ते 3 लाख रुपये लागू शकतात. नोकरीतून निवृत्त झाल्यावरही ही महागाई थांबत नाही, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.
मग नक्की किती रक्कम हवी?
आर्थिक सल्लागार यासाठी एक सोपा नियम सांगतात. तुम्ही ज्या वर्षी रिटायर होणार आहात, त्या वर्षाच्या तुमच्या एकूण खर्चाच्या 25 ते 30 पट रक्कम तुमच्याकडे जमा असायला हवी. या रकमेतून दरवर्षी 3 ते 4 टक्के रक्कम काढली, तर जमापुंजी लवकर संपणार नाही आणि आयुष्यभर पुरेल. जर तुमचा वार्षिक खर्च 20 लाख रुपये असेल, तर तुमच्याकडे किमान 5 कोटी रुपयांची बचत असायला हवी.
एक कोटी रुपयांचं आता काही खरं आहे का?
एकेकाळी 'एक कोटी रुपये' ही रिटायरमेंटसाठी खूप मोठी रक्कम मानली जायची. पण आजच्या काळात, विशेषतः शहरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तीसाठी ही रक्कम काहीच नाही. औषधं आणि खाण्यापिण्याच्या मूलभूत खर्चासाठीही ही रक्कम अपुरी पडू शकते. लोकांचं सरासरी आयुर्मान वाढलं आहे आणि आरोग्यावरील खर्चही वाढला आहे, हे लक्षात घेता एक कोटी ही खूपच छोटी रक्कम आहे. आजच्या काळात शहरांमध्ये व्यवस्थित रिटायरमेंट आयुष्य जगण्यासाठी महिन्याला 1 ते 2 लाख रुपये खर्च येतो. या हिशोबाने तुमच्याकडे साधारणपणे 3 कोटी ते 8 कोटी रुपये असायला हवेत.
आयुष्य वाढतंय, तरतूदही वाढवावी लागेल
आजचं रिटायरमेंट म्हणजे फक्त कसंतरी जगणं नाही, तर मुलांवर किंवा इतरांवर अवलंबून न राहता सन्मानाने जगणं आहे. हॉटेलमध्ये जेवायला जाण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी आणि आपले छंद जोपासण्यासाठी पैसा लागतोच. आयुर्मान वाढल्यामुळे रिटायरमेंटनंतरच्या 25 ते 30 वर्षांच्या आयुष्याचं प्लॅनिंग आधीच करावं लागतं. गुंतवणुकीसाठी कोणताही एक जादुई आकडा नाही. तुमचा आजचा खर्च काढा, त्यात महागाईचा विचार करून भविष्यातील रक्कम ठरवा आणि ती मिळवण्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा. जेवढ्या लवकर सुरुवात कराल, तेवढं ध्येय गाठणं सोपं होईल.