
भाड्याच्या घरात राहायचं की कर्ज काढून स्वतःचं घर घ्यायचं, हा अनेक कुटुंबांसाठी एक मोठा आर्थिक निर्णय असतो. जर तुम्ही महिन्याला ₹25,000 खर्च करू शकत असाल, तर ही रक्कम भाड्यावर खर्च करणं आणि तीच रक्कम गृहकर्जाचा हप्ता (EMI) म्हणून भरणं यात 10 किंवा 20 वर्षांत काय फरक पडतो? याचं एक प्रॅक्टिकल गणित आपण समजून घेऊया.
समजा तुम्ही ₹50 लाख किमतीचं घर विकत घेत आहात.
या हिशोबानुसार ₹40 लाखांच्या कर्जासाठी तुमचा मासिक EMI साधारण ₹35,989 इतका असेल. म्हणजेच, ₹25,000 भाड्याशी तुलना केली, तर हे घर घेण्यासाठी तुम्हाला दरमहा सुमारे ₹11,000 जास्त मोजावे लागतील.
टीप : हे फक्त एक उदाहरणादाखल दिलेलं गणित आहे. प्रत्यक्ष EMI हा व्याजदर, कर्जाची रक्कम आणि कालावधीनुसार बदलू शकतो.
जर तुमचं मासिक भाडं ₹25,000 असेल आणि त्यात कोणतीही वाढ झाली नाही असं गृहीत धरलं तर:
पण प्रत्यक्षात भाडं नेहमी सारखं राहत नाही. दर काही वर्षांनी घरमालक भाडं वाढवतो. उदाहरणार्थ, जर दरवर्षी सरासरी 5% ने भाडं वाढलं, तर 20 वर्षांत तुम्ही भरलेलं एकूण भाडं ₹60 लाखांपेक्षा खूप जास्त असेल. त्यामुळे, ₹25,000 × 240 महिने = ₹60 लाख, असा साधा हिशोब इथे चालत नाही.
यामध्ये तुमची मूळ कर्जाची रक्कम ₹40 लाख आहे, पण तुम्ही व्याज म्हणून सुमारे ₹46.37 लाख भरता. म्हणजेच ₹40 लाखांचं कर्ज घेतल्यास, 20 वर्षांत तुम्हाला फक्त व्याज म्हणून जवळपास ₹46 लाख द्यावे लागतात. यासोबतच डाऊन पेमेंट, रजिस्ट्रेशनचा खर्च, मेंटेनन्स, प्रॉपर्टी टॅक्स आणि इन्शुरन्स यांसारख्या खर्चाचाही विचार करणं गरजेचं आहे.
भाड्याच्या घरात राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरुवातीला मोठी रक्कम डाऊन पेमेंट म्हणून द्यावी लागत नाही. नोकरी किंवा शहर बदलावं लागलं, तर घर बदलणं तुलनेने सोपं असतं. पण, तुम्ही भरत असलेल्या भाड्यातून घरावर तुमची मालकी तयार होत नाही. शिवाय, काळानुसार भाडं वाढण्याची शक्यता असतेच.
EMI वर घर घेताना सुरुवातीला डाऊन पेमेंट भरावं लागतं. त्यानंतर दीर्घकाळासाठी EMI भरावा लागतो आणि त्यावर व्याजही लागतं. पण दुसरीकडे, कर्ज पूर्ण फेडल्यानंतर ते घर तुमची स्वतःची मालमत्ता बनते.
मात्र, घर घेतल्यानंतर फक्त EMI हाच एकमेव खर्च नसतो. मेंटेनन्स, प्रॉपर्टी टॅक्स, इन्शुरन्स आणि दुरुस्ती यांसारखे अतिरिक्त खर्चही असतात. त्यामुळे, भाडं की EMI हे ठरवताना फक्त महिन्याचा खर्च न पाहता, सुरुवातीची गुंतवणूक, दीर्घकालीन खर्च, राहण्याचा कालावधी आणि तुमची आर्थिक स्थिती या सगळ्याचा एकत्रित विचार करायला हवा.
या प्रश्नाचं सर्वांना लागू पडेल असं एकच उत्तर नाही. जर तुम्ही वारंवार नोकरी किंवा शहर बदलत असाल, किंवा तुम्हाला मोठं डाऊन पेमेंट आणि दीर्घकालीन कर्जाचं ओझं नको असेल, तर भाड्याने राहणं तुमच्यासाठी सोयीचं ठरू शकतं.
जर तुम्ही एकाच भागात दीर्घकाळ राहण्याचा विचार करत असाल, तुमच्याकडे डाऊन पेमेंट भरण्याची क्षमता असेल आणि EMI नियमित भरण्याइतपत स्थिर उत्पन्न असेल, तर तुम्ही EMI चा पर्याय निवडू शकता.
पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी घराची किंमत + भाडं + EMI + व्याज + मेंटेनन्स + प्रॉपर्टी टॅक्स + डाऊन पेमेंट + गुंतवणुकीचे इतर पर्याय या सगळ्याचं गणित मांडणं महत्त्वाचं आहे. फक्त ₹25,000 भाडं कमी वाटतंय म्हणून किंवा EMI भरला की घर स्वतःचं होईल, या भावनिक विचारावर निर्णय घेऊ नका.