
टेलिकॉम सेक्टरमध्ये जिओ आणि त्यानंतर कॅम्पा कोलाच्या माध्यमातून कूल ड्रिंक्स मार्केट गाजवल्यानंतर, आता मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वांच्या लाडक्या आईस्क्रीम मार्केटमध्ये ग्रँड एंट्री मारली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने त्यांचा नवीन आईस्क्रीम ब्रँड 'बॉम्बे क्रीमरी' (Bombay Creamery) अधिकृतपणे लाँच केला आहे.
या ब्रँडच्या आईस्क्रीमची सुरुवातीची किंमत फक्त १० रुपये आहे. सर्वसामान्यांना कमी पैशात दर्जेदार आईस्क्रीम देण्याच्या उद्देशाने रिलायन्सने हे पाऊल उचललं आहे. देशातील आईस्क्रीम मार्केट सध्या जवळपास ३०,००० कोटी रुपयांचं असून, २०२८ पर्यंत ते ५०,००० कोटींवर पोहोचेल असा अंदाज आहे. याच मोठ्या मार्केटवर कब्जा करण्यासाठी अंबानींनी हा नवा प्लॅन आणला आहे.
बॉम्बे क्रीमरी आईस्क्रीममध्ये कोणतेही बनावट पदार्थ नसून, ते अस्सल डेअरी क्रीमपासून बनवल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. ग्राहकांना दर्जेदार आईस्क्रीमचा अनुभव देणं हाच त्यांचा मुख्य हेतू आहे. या ब्रँडअंतर्गत कप्स, कोन्स, टब्स, बार्स आणि स्टिक्स अशा विविध प्रकारांमध्ये आईस्क्रीम उपलब्ध होणार आहेत.
या लाँचिंगबद्दल बोलताना रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे डायरेक्टर टी. कृष्णकुमार म्हणाले, "डेअरी प्रॉडक्ट्स बनवताना कोणताही शॉर्टकट नसावा, या एका छोट्या विचारातून आम्ही बॉम्बे क्रीमरीची निर्मिती केली आहे. आम्ही फक्त आईस्क्रीम कॅटेगरीमध्ये प्रवेश करत नाही आहोत, तर इथे दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ओरिजिनल डेअरी क्रीमपासून बनवलेली बॉम्बे क्रीमरी, प्रत्येक भारतीय कुटुंबाला परवडणाऱ्या किमतीत खऱ्या आईस्क्रीमची चव देईल."
बॉम्बे क्रीमरी सुरुवातीला पश्चिम भारतात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर हळूहळू देशभरात सर्वत्र तिचा विस्तार केला जाईल. रिलायन्सचं मोठं रिटेल नेटवर्क आणि हजारो डिस्ट्रिब्युटर्स या ब्रँडला वेगाने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतील.
सध्या आरसीपीएल (RCPL) चं बिझनेस नेटवर्क खूप मजबूत आहे. ईशा अंबानी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून या कंपनीचे व्यवहार आणि विस्तार योजना पाहत आहेत. याआधी कॅम्पा कोला कमी किमतीत मार्केटमध्ये आणून जसं यश मिळवलं, तसाच फॉर्म्युला आता आईस्क्रीम सेक्टरमध्येही वापरण्याचा रिलायन्सचा विचार आहे.
रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या पोर्टफोलिओमध्ये आधीपासूनच अनेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे..
• कूल ड्रिंक्स: कॅम्पा कोला (कोला, ऑरेंज, लेमन फ्लेवर्स).
• अन्नधान्य आणि तेल: इंडिपेंडन्स (सनफ्लॉवर ऑइल, गव्हाचं पीठ, पिण्याचं पाणी), उधम, माना (डाळी, तांदूळ).
• सॉस आणि बिस्किटे: सिल (सॉस, जॅम, नूडल्स), मालिबान (बिस्किटे).
• पर्सनल केअर: ग्लिमर, प्युरिक, गेट रिअल सोप्स, ब्रायलक्रीम, टोनी अँड गाय हेअर प्रॉडक्ट्स.
• होम केअर: डोझो (डिशवॉशिंग बार, लिक्विड्स), एन्झो (डिटर्जंट), होमगार्ड (फ्लोअर क्लीनर्स).
सध्या भारतीय आईस्क्रीम मार्केटमध्ये अमूल पहिल्या नंबरवर आहे. तर क्वालिटी वॉल्स, वाडीलाल, मदर डेअरी, हॅट्सन ॲग्रो आणि हॅवमोर यांसारखे ब्रँड्स मुख्य स्पर्धक आहेत. यामध्ये अमूलची मँगो स्टिक आईस्क्रीम सर्वात कमी म्हणजे २० रुपयांना मिळते. पण रिलायन्सने थेट १० रुपयांत आईस्क्रीम आणल्यामुळे इतर कंपन्यांवर दबाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पण आईस्क्रीमचा बिझनेस करणं हे इतर कूल ड्रिंक्ससारखं सोपं नाही. यासाठी कोल्ड चेन नेटवर्क आणि सतत फ्रीझर्स उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे. सध्या रिलायन्सकडे असलेलं मोठं भांडवल आणि डिस्ट्रिब्युशनच्या जोरावर त्यांनी दुकानदारांना चांगल्या ऑफर्स दिल्या, तर मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होणं नक्की आहे. येणाऱ्या काळात याचा परिणाम इतर कंपन्यांच्या प्रॉफिट मार्जिनवर होऊ शकतो, असं मार्केट तज्ज्ञांचं म्हणणं आहे.