New FD Rules : आजपासून एफडीचे नियम बदलले, तुमच्यावर काय परिणाम होणार?

Published : Oct 01, 2026, 12:30 PM IST
RBI FD Rules

सार

१ ऑक्टोबरपासून बँकांच्या एफडी (FD) नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. पण यामुळे सर्वसामान्यांना घाबरण्याची गरज नाही. नेमका कोणावर याचा परिणाम होणार, ते सोप्या भाषेत समजून घेऊया.

मुंबई : बँकेत फिक्स डिपॉझिट (FD) असलेल्या ग्राहकांना नव्या नियमांची अजिबात धास्ती घेण्याची गरज नाही. कारण, हे नवे व्याजदराचे नियम सगळ्याच एफडींना लागू होणार नाहीत. जे लोक ३ कोटी किंवा त्याहून अधिक रकमेची एफडी करणार आहेत किंवा रिन्यू करणार आहेत, फक्त त्यांच्यासाठीच हा बदल आहे.

एफडीच्या व्याजदरात कोणासाठी बदल?

नव्या नियमानुसार, जर तुमची एफडी ३ कोटींपेक्षा कमी असेल, तर १ ऑक्टोबरपासून तुमच्या व्याजदरात अचानक कोणताही बदल होणार नाही. तुम्ही आधीच केलेली एफडी जुन्याच व्याजदराने आणि अटींनुसार पुढे चालू राहील. हा बदल फक्त ३ कोटी किंवा त्याहून अधिक रकमेच्या एफडीसाठी झाला आहे. अशा एफडींना 'बल्क डिपॉझिट' (Bulk Deposit) मानलं जातं. या बल्क डिपॉझिटवर बँक किती व्याज देणार, हे त्यांना आता त्यांच्या वेबसाईटवर स्पष्टपणे सांगावं लागणार आहे.

बँकांना आता प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत बल्क डिपॉझिटचे व्याजदर वेबसाईटवर अपडेट करावे लागतील. यामुळे मोठी रक्कम एफडी करणाऱ्यांना किंवा जुनी एफडी रिन्यू करणाऱ्यांना आधीच व्याजदर किती आहे, याची पक्की माहिती मिळेल.

यातला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, बँकेने जो व्याजदर आधीच जाहीर केला आहे, तोच त्या एफडीला लागू करावा लागेल. एकाच बँकेत एकाच दिवशी केलेल्या समान बल्क डिपॉझिटसाठी व्याजदरही एकच असला पाहिजे. तुम्ही दुसऱ्या शाखेतून एफडी केली किंवा वेगळं बँकिंग चॅनेल वापरलं, म्हणून व्याजदर बदलता कामा नये.

ज्यांनी आधीच एफडी करून ठेवली आहे, त्यांच्यावर या नियमाचा लगेच कोणताही परिणाम होणार नाही. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे ५ लाख, १० लाख, ५० लाख किंवा २ कोटींची एफडी असेल, तर १ ऑक्टोबरला लागू झालेल्या या नियमामुळे तुमचा व्याजदर बदलणार नाही.

मोठ्या रकमेची एफडी करताना ग्राहकांना व्याजदराची आधीच स्पष्ट माहिती मिळावी, या उद्देशाने आरबीआयने (RBI) हा बदल केला आहे. आरबीआयने ३० जुलै २०२६ रोजी हे सुधारित नियम जाहीर केले होते आणि १ ऑक्टोबरपासून ते लागू झाले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

EaseMyTrip ने भारतात लाँचसाठी केली पार्टनरशिप, बुकिंग होणार सोपे; वाचा संपूर्ण डिटेल्स
Maruti Suzuki Victoris SUV: २७ किमी मायलेज, ३६०° कॅमेरा आणि ADAS; ग्रँड विटारालाही टाकलं मागे!