
इंडियन एसयूव्ही मार्केटमध्ये मारुती सुझुकीच्या नवीन 'व्हिक्टोरिस'ने (Victoris) जोरदार एन्ट्री मारली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या पहिल्या आठ महिन्यांत कंपनीने व्हिक्टोरिसच्या तब्बल ९८,२२४ युनिट्सची विक्री केली आहे. विशेष म्हणजे, एकाच प्लॅटफॉर्मवर बनलेल्या मारुतीच्याच 'ग्रँड विटारा'ला (Grand Vitara) या कारने विक्रीत धोबीपछाड दिली आहे. याच काळात ग्रँड विटाराच्या फक्त ५३,१७४ युनिट्सची विक्री झाली. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ मध्ये ग्रँड विटाराच्या ६८,१६६ गाड्या विकल्या गेल्या होत्या, त्या तुलनेत यंदा तिच्या विक्रीत २२ टक्क्यांची मोठी घट झाली आहे.
जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या काळात ४.२ ते ४.५ मीटर लांबीच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) अजूनही नंबर वनवर आहे. क्रेटा आणि क्रेटा ईव्ही मिळून या काळात १,२५,७६७ युनिट्सची विक्री झाली. २०२५ च्या याच काळात हा आकडा १,३३,८८२ इतका होता, म्हणजे क्रेटाच्या विक्रीत ५.७ टक्क्यांची घट झाली आहे. पण मारुतीची नवीन व्हिक्टोरिस ९८,२२४ युनिट्स विकून थेट दुसऱ्या नंबरवर पोहोचली आहे. या लिस्टमध्ये किया सेल्टॉस (Kia Seltos) ८७,०६२ युनिट्ससह तिसऱ्या, तर टोयोटा हायरायडर (Toyota Hyryder) ७१,०२५ युनिट्ससह चौथ्या नंबरवर आहे. ग्रँड विटारा ५३,१७४ युनिट्ससह पाचव्या नंबरवर घसरली आहे. २०२५ मधील ६८,१६६ युनिट्सच्या तुलनेत या मॉडेलच्या विक्रीत २२% घट झाली आहे.
किया सेल्टॉसच्या विक्रीतही मोठी वाढ पाहायला मिळाली. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ मध्ये सेल्टॉसच्या ४७,५८० गाड्या विकल्या गेल्या होत्या, तर २०२६ च्या याच काळात हा आकडा थेट ८७,०६२ वर पोहोचला. टोयोटा हायरायडरनेही चांगलीच गती पकडली आहे. २०२५ च्या पहिल्या आठ महिन्यांत ५२,१३२ युनिट्स विकणाऱ्या हायरायडरने २०२६ मध्ये ७१,०२५ चा टप्पा गाठला. हायरायडरच्या विक्रीत ३६.२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
मारुती व्हिक्टोरिसचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे यातलं सीएनजी (CNG) तंत्रज्ञान. अंडरबॉडी सीएनजी टँक असलेली ही कंपनीची पहिलीच गाडी आहे. गाडीची डिकी (बूट स्पेस) न अडवता सीएनजी टँक बसवल्याने ग्राहकांना चांगलीच सोय झाली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, याच्या सीएनजी व्हेरियंटमध्ये तब्बल २७ किमी/किलो इतकं जबरदस्त मायलेज मिळतं.
इंटेरियरबद्दल बोलायचं तर, यात १०.२५ इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि ३-स्पोक स्टिअरिंग व्हील दिलं आहे. सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस (ABS with EBD), ट्रॅक्शन कंट्रोल, ब्रेक असिस्ट, हिल होल्ड कंट्रोल आणि आयसोफिक्स चाईल्ड सीट माऊंट्स मिळतात. टॉप व्हेरियंट्समध्ये ३६०° कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) सुद्धा आहे. याशिवाय, गाडीत लेव्हल २ ADAS तंत्रज्ञानही देण्यात आलं आहे.
ADAS पॅकेजमध्ये रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, हाय बीम असिस्ट आणि लेन चेंज अलर्ट यांसारखे आधुनिक फीचर्स मिळतात. विशेष म्हणजे, व्हिक्टोरिसला भारत एनसीएपी (Bharat NCAP) क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. दमदार विक्रीसोबतच सीएनजीचं मायलेज, भारी फीचर्स आणि सुरक्षेचे तंत्रज्ञान यामुळे मिडसाईझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये व्हिक्टोरिस सध्या ग्राहकांची पहिली पसंती बनत आहे.