
सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. यात एक माणूस चपलांच्या ढिगाऱ्यातून आपली हरवलेली एक चप्पल शोधण्यासाठी चक्क चॅटजीपीटी (ChatGPT) वापरताना दिसतोय. त्याचा हा आर्टिफिशियल इंटेलिजेंस वापरण्याचा अनोखा प्रकार पाहून नेटकरी चकित झाले आहेत आणि यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
शुभंग बोरकर नावाच्या एका इन्स्टाग्राम युझरने हा व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे. यात दिसतंय की, एका ठिकाणी शेकडो चपलांचा ढीग पडला आहे. अगदी आपल्याकडच्या मोठ्या देवळाबाहेर जशी चपलांची रास लागते, तसंच काहीसं चित्र होतं. सोशल मीडिया पोस्टनुसार, या व्यक्तीची एक चप्पल तब्बल 1,000 हून अधिक चपलांच्या गर्दीत कुठेतरी हरवली होती. खूप शोधूनही ती त्याला सापडत नव्हती.
मग काय, एवढा वेळ कोण घालवणार म्हणून त्याने एक भन्नाट आयडिया लढवली. त्याने थेट चॅटजीपीटीची मदत घ्यायचं ठरवलं. त्याने त्या चपलांच्या ढिगाचा फोटो काढला आणि AI चॅटबॉटला आपली चप्पल शोधायला सांगितली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही वेळातच त्याला त्याची चप्पल सापडली. हे पाहून आजूबाजूचे लोकही हसू लागले.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युझरने लिहिलं, "अरे, चॅटजीपीटीचा असाही वापर करता येतो हे माहीतच नव्हतं." तर दुसऱ्याने मस्करीत म्हटलं, "त्यातली सगळ्यात भारी जोडी उचलून निघायचं ना."
एकाने लिहिलं, "AI बिचारा कोपऱ्यात बसून रडत असेल." तर दुसरा म्हणाला, "यासाठी तू Gemini Live पण वापरू शकला असतास." पण अनेकांनी त्याच्या या कल्पकतेचं कौतुक केलं. एकाने म्हटलं, “Modern problems require modern solutions.” (म्हणजे, आधुनिक समस्यांवर आधुनिक उपाय हवेत).अर्थात, या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पडताळणी करता आलेली नाही.