Independence Day 2026 : गाडीवर ‘भारत सरकार’ किंवा अशोक स्तंभ लावता? आधी जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

Published : Aug 15, 2026, 01:27 PM IST
Independence Day

सार

खासगी वाहनांवर ‘भारत सरकार’, अशोक स्तंभ किंवा राष्ट्रीय प्रतीकांचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. अन्यथा तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

मुंबई : आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनाच उत्साह पाहायला मिळत आहे. या खास दिवशी देशाचा मान-सन्मान, संविधान आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल प्रत्येक भारतीयाची मान उंचावली जाते. मात्र, देशभक्ती व्यक्त करण्याच्या उत्साहात अनेकजण नकळत अशा काही गोष्टी करतात, ज्या कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरू शकतात. देशाच्या सार्वभौमत्वाचे महत्त्वाचे प्रतीक असलेल्या ‘अशोक स्तंभ’ आणि त्याखालील ‘सत्यमेव जयते’ यांचा वापर कोण करू शकतो, हा त्यापैकीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

‘अशोक चक्र’ आणि ‘सत्यमेव जयते’चा वापर कोण करू शकते?

भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणजे State Emblem of India हे केवळ एक सामान्य डिझाइन नाही. तर भारत सरकारची अधिकृत ओळख आहे. कायद्यानुसार त्याचा वापर केवळ केंद्र सरकारकडून अधिकृत परवानगी असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांनाच करता येतो.यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य स्तरावरील मंत्रांचा समावेश आहे. तसेच संसद आणि विधानसभेचे सदस्य यांना त्याचा वापर करता येतो. न्यायपालिकेतील भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीश यांनाही अधिकृतपणे वापरता येतो.

तसेच भारतीय पासपोर्ट, चलनातील नोटा व नाणी, शासकीय राजपत्र, अधिकृत लेटरहेड आणि भारतीय दूतावास यांसारख्या अधिकृत शासकीय कागदपत्रांवरही या प्रतीकाचा वापर केला जातो. सर्वसामान्य नागरिक शैक्षणिक उद्देशाने किंवा सन्मान म्हणून त्याचा उल्लेख करू शकतात. मात्र खासगी व्यवसायाची ब्रँडिंग, व्हिजिटिंग कार्ड किंवा वाहनांवर त्याचा वापर करता येत नाही.

भारत सरकारचे प्रतीक का लावू शकत नाहीत?

गाडीवर अशोक चक्र किंवा भारताचे राजचिन्ह लावण्याचा अधिकार मर्यादित आहे. हे प्रतीक सत्ता, प्रशासकीय अधिकार आणि घटनात्मक पदाची ओळख दर्शवते. एखाद्या सामान्य नागरिकाने आपल्या खासगी वाहनावर अशोक स्तंभ किंवा ‘भारत सरकार’ असे लिहिल्यास त्या वाहनात एखादा वरिष्ठ शासकीय अधिकारी किंवा घटनात्मक पदावरील व्यक्ती प्रवास करत असल्याचा गैरसमज निर्माण होऊ शकतो.

काहीजण अशा चिन्हाचा गैरवापर करून टोलपासून बचाव, व्हीआयपी पार्किंग किंवा पोलिसांच्या तपासणीपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय प्रतीकाचा चुकीचा आणि अनधिकृत वापर रोखण्यासाठी खासगी वाहनांवर त्याचा वापर करण्यास बंदी आहे.

नियम मोडल्यास किती शिक्षा होऊ शकते?

भारतामध्ये राष्ट्रीय प्रतीकाच्या चुकीच्या वापराला आळा घालण्यासाठी ‘The State Emblem of India (Prohibition of Improper Use) Act, 2005’ लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार राष्ट्रीय प्रतीकाचा अनधिकृत वापर करणे गंभीर बाब मानली जाते. एखाद्या व्यक्तीने स्वतःला शासकीय अधिकारी दाखवण्यासाठी किंवा प्रभाव निर्माण करण्यासाठी वाहन अथवा कागदपत्रांवर राष्ट्रीय प्रतीकाचा चुकीचा वापर केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास आणि 5 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

तसेच दुकान, कंपनी, लोगो किंवा जाहिरातीमध्ये परवानगीशिवाय राष्ट्रीय प्रतीकाचा वापर करून व्यावसायिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्यास किमान सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

देशभक्तीबरोबर कायद्याचेही पालन करा

स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करताना देशाबद्दल अभिमान बाळगणे आणि तिरंग्याचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे. मात्र, राष्ट्रीय प्रतीकांचा वापर करताना कायद्याचे पालन करणेही तितकेच आवश्यक आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

चपलांच्या गर्दीत हरवलेली चप्पल शोधण्यासाठी AI ला लावलं कामाला, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल
Rakshabandhan Gift Ideas : रक्षाबंधनासाठी भावाला काय द्यायचं? हे 5 गॅजेट्स आहेत बेस्ट ऑप्शन!