Smartphone Exchange : जुना फोन विकण्यापूर्वी किंवा एक्सचेंज करण्यापूर्वी करा 'ही' ६ कामे

Published : Oct 30, 2026, 09:45 AM IST
Smartphone Exchange : जुना फोन विकण्यापूर्वी किंवा एक्सचेंज करण्यापूर्वी करा 'ही' ६ कामे

सार

दिवाळीच्या काळात नवीन स्मार्टफोन घेताना जुना फोन विकणार असाल किंवा एक्सचेंज करणार असाल, तर त्यापूर्वी वैयक्तिक अन् फायनान्शियल डेटा सुरक्षित करणे गरजेचे आहे.

मुंबई : दिवाळी आणि सण-उत्सवाच्या काळात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची आणि जुना फोन विकण्याची किंवा एक्सचेंज करण्याची मोठी लाट येते. पण आपल्या जुन्या फोनमध्ये फोटो, मेसेज, बँकिंग ॲप्स आणि विविध अकाउंट्सचे आयडी-पासवर्ड सेव्ह असतात. त्यामुळे फोन व्यवस्थित क्लीन न करता दुसऱ्याच्या हातात दिला, तर तुमचा डेटा अन् बँक खात्यातील पैसे दोन्ही धोक्यात येऊ शकतात. म्हणूनच जुना फोन विकण्यापूर्वी ६ गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.

१. फोटो, फायली अन् व्हॉट्सॲप चॅटचा बॅकअप घ्या

अँड्रॉइड फोन वापरत असाल तर सेटिंग्जमधील गुगल पर्यायावर जाऊन 'Back up now' वर क्लिक करा. आयफोन वापरकर्त्यांनी सेटिंग्जमध्ये स्वतःच्या नावावर क्लिक करून iCloud > iCloud Backup मध्ये जाऊन 'Back Up Now' वर टॅप करावे.

व्हॉट्सॲपचा बॅकअप स्वतंत्रपणे घ्यावा लागतो. व्हॉट्सॲप उघडून Settings > Chats > Chat backup > Back up असा पर्याय निवडा. जर तुम्ही त्याच ब्रँडचा नवीन फोन घेत असाल, तर सेटअप करतानाच चॅट्स थेट ट्रान्सफरही करू शकता.

२. बँक आणि UPI ॲप्स लॉग आउट करा

प्रत्येक युपीआय ॲप उघडून त्यातून आपले बँक खाते अनलिंक करा किंवा युपीआय आयडी डी-रजिस्टर करा. मोबाईल बँकिंग, डिजिटल वॉलेट आणि ट्रेडिंग ॲप्स डिलीट करण्यापूर्वी त्यातून लॉग आउट होणे आवश्यक आहे. या ॲप्सचा थेट संबंध तुमच्या पैशांशी असतो, त्यामुळे ही पायरी सर्वात महत्त्वाची आहे.

३. Google, Apple आणि Samsung अकाउंट्स काढून टाका

अँड्रॉइड फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Accounts किंवा Passwords and accounts पर्याय निवडा. तिथे आपले Google अकाउंट सिलेक्ट करून 'Remove account' वर क्लिक करा. सॅमसंग फोन वापरणाऱ्यांनी त्यांचे Samsung account देखील असेच रिमूव्ह करावे. आयफोन वापरकर्त्यांनी सेटिंग्जमध्ये स्वतःच्या नावावर टॅप करून सर्वात शेवटी असणाऱ्या 'Sign Out' पर्यायावर क्लिक करावे.

यामुळे आयफोनमधील Activation Lock आणि अँड्रॉइडमधील Factory Reset Protection डिझॅबल होते. तुम्ही हे अकाउंट्स रिमूव्ह केले नाही, तर फॅक्टरी रिसेट केल्यानंतरही फोन तुमच्याच अकाउंटशी लिंक राहील आणि नवीन खरेदीदाराला तो वापरता येणार नाही.

४. सिम कार्ड आणि मेमरी कार्ड बाहेर काढा

फोनमधील फिजिकल सिम कार्ड आणि मायक्रो एसडी मेमरी कार्ड आठवणीने बाहेर काढा. जर तुम्ही ई-सिम (eSIM) वापरत असाल, तर आधी ते नवीन फोनमध्ये ट्रान्सफर करा आणि मगच जुन्या फोनमधून डिलीट करा. यासोबतच फोनशी कनेक्ट केलेले स्मार्टवॉच, इयरफोन्स किंवा इतर ब्लूटूथ डिव्हाइसेस अनपेअर करायला विसरू नका.

५. शेवटी फोन 'फॅक्टरी रिसेट' करा

अँड्रॉइड फोनमध्ये Settings > System > Reset options मध्ये जाऊन 'Erase all data (factory reset)' हा पर्याय निवडा. प्रत्येक कंपनीच्या फोनमध्ये या पर्यायाचे नाव थोडे वेगळे असू शकते. आयफोनमध्ये Settings > General > Transfer or Reset iPhone मध्ये जाऊन 'Erase All Content and Settings' वर क्लिक करा.

वर सांगितलेल्या पहिल्या चार पायऱ्या पूर्ण केल्यानंतरच फॅक्टरी रिसेट ही पाचवी पायरी पूर्ण करा.

६. व्यवहाराची पावती आणि IMEI नंबर जतन करा

फोन रिसेट करण्यापूर्वी *#06# डायल करून तुमच्या फोनचा IMEI नंबर कुठेतरी लिहून ठेवा. फोन विकल्याची पावती किंवा एक्सचेंजची स्लीप सुरक्षित ठेवा. भविष्यात त्या फोनचा काही गैरवापर झालाच, तर त्या तारखेनंतर फोन तुमच्याकडे नव्हता याचा हा कायदेशीर पुरावा ठरेल. सर्वात शेवटी, तुमच्या गुगल किंवा ॲपल अकाउंटमधील 'Linked Devices' ची यादी तपासून जुना फोन तिथून रिमूव्ह करा.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

EVs : 5 नवीन भन्नाट इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येणार; एका चार्जमध्ये 500 किमी पेक्षा जास्त धावणार
PhonePe : अवघ्या 11 रुपयांत 25 हजार रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स, फोनपेची जबरदस्त ऑफर