
न्यूयॉर्क : आजकाल जवळपास सगळेच जण इन्स्टाग्राम वापरतात. लोक आपले फोटो, व्हिडीओ आणि रील्स शेअर करून इथे खूप अॅक्टिव्ह असतात. अनेक जण तर कंटेंट क्रिएटर म्हणून यातून चांगली कमाईसुद्धा करत आहेत. पण इन्स्टाग्राम खरंच काही कामाचं नाहीये का? एका एक्स (X) युझरने आपलं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केल्याचं जाहीर केलं. त्यावर उद्योगपती एलॉन मस्क यांनी लगेच रिप्लाय दिला. इन्स्टाग्राम हे फक्त मुलींसाठी असलेलं अॅप आहे, असं म्हणत मस्क यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.
जैगर कॅपिटल (Jaeger Capital) नावाच्या एका एक्स युझरने एक पोस्ट केली होती. 'मी माझं इन्स्टाग्राम अकाउंट अधिकृतपणे डिलीट केलंय. हे अॅप पूर्णपणे महिलांसाठी आहे आणि याचा मला शून्य फायदा झाला,' असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. सुरुवातीला ही पोस्ट फारशी व्हायरल झाली नव्हती. पण एलॉन मस्क यांनी यावर कमेंट केली आणि सगळं चित्रच बदललं. इन्स्टाग्राम हे मुलींचं अॅप आहे, असा रिप्लाय मस्क यांनी दिला. यानंतर लगेचच वादाला तोंड फुटलं. मस्क यांनी लिंगभेद केल्याचा आरोप आता लोक करत आहेत. जगभरात वापरल्या जाणाऱ्या इन्स्टाग्रामबद्दल असं वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
इन्स्टाग्राम वापरणाऱ्या पुरुषांचा एलॉन मस्क यांनी अपमान केल्याची भावना अनेक युझर्सनी व्यक्त केली आहे. मग मस्क यांच्या मालकीचं असलेलं एक्स (X) हे काय फक्त पुरुषांचं अॅप आहे का, असा सवाल लोक विचारत आहेत. मस्क विनाकारण काहीही पोस्ट करून वाद निर्माण करत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मस्क यांना फक्त पुरुषच आवडतात, असा टोलाही काहींनी लगावला आहे. ज्या माणसाला फक्त पुरुषांचीच काळजी आहे, त्याच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार, अशी नाराजी काही युझर्सनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियाच्या जगात बरेच बदल पाहायला मिळत आहेत. अनेक प्लॅटफॉर्म्स सध्या ट्रेंडिंगमध्ये आघाडीवर आहेत. पण एक्स (X) मात्र थोडं मागे पडल्याचं काही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर, एक्सवर एखादा नवा वाद निर्माण करून ट्रेंड सेट करण्याचा मस्क यांचा प्लॅन असू शकतो. अशा अनावश्यक कमेंट्स करून नवीन ट्रेंड तयार करायचा आणि एक्सला पुन्हा चर्चेत आणायचं, हाच मस्क यांचा मुख्य उद्देश आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.