
मुंबई : सेंट्रल रेल्वेने ट्रेन प्रवाशांसाठी तिकीट चेकिंग अधिक कडक केली आहे. रेल्वेने १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या एक महिन्याच्या कालावधीसाठी विशेष तिकीट चेकिंग मोहीम सुरू केली आहे. यात प्रामुख्याने तिकिटाची वैधता, सवलती, रिझर्व्हेशन कोटा आणि रेल्वे पास यांची कसून तपासणी केली जाणार आहे.
तुम्ही जर एकाच तिकिटावर कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत प्रवास करत असाल, तर आता जास्त काळजी घ्यावी लागेल. एकाच तिकिटावर अनेक प्रवाशांची नावे असतील, तर त्यापैकी किमान एका प्रवाशाकडे स्वतःचे ओरिजिनल ओळखपत्र (ID Proof) असणे सक्तीचे आहे. जर कोणीही ओरिजिनल ओळखपत्र दाखवू शकले नाही, तर त्या तिकिटावरील सर्व प्रवाशांना 'विनातिकीट' मानले जाईल. त्यानंतर रेल्वेच्या नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
तिकीट दरात सवलत (Concession) घेणाऱ्या प्रवाशांकडे फक्त तिकीट असून चालणार नाही. प्रवासादरम्यान सवलतीसाठी पात्र असल्याचे सिद्ध करणारी ओरिजिनल कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. रिझर्व्हेशन कोट्यातून तिकीट मिळवलेल्या प्रवाशांचीही रेल्वे अधिकारी सविस्तर तपासणी करतील. अधिकाऱ्यांनी विचारल्यास सवलत किंवा विशेष कोट्याशी संबंधित मूळ कागदपत्रे दाखवावी लागतील.
रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ई-पास किंवा पॅसेंजर ऑर्डर तिकिटावर प्रवास करताना ओरिजिनल ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी ई-पास किंवा पॅसेंजर ऑर्डर तिकीट अधिकृत ट्रॅव्हल ऑथॉरिटीमध्ये बदलून घेणे आवश्यक आहे. असे न करता प्रवास केल्यास त्यांनाही विनातिकीट प्रवासी मानून कारवाई केली जाऊ शकते.
विनातिकीट किंवा अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्यांसाठी किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आला आहे. हा दंड तिकीट भाड्याव्यतिरिक्त भरावा लागेल.
रिझर्व्हेशन तिकिटांसोबतच जनरल (अनरिझर्व्हड) तिकिटांची चेकिंगही कडक केली जाईल. तिकीट खरे आहे की नाही याबाबत शंका आल्यास, तिकीट तपासनीस (TTE) 'तिकीट एक्झामिनर ॲप' वापरून माहितीची पडताळणी करतील.
प्रवासादरम्यान ओळखपत्राच्या झेरॉक्सऐवजी ओरिजिनल ओळखपत्र सोबत ठेवा. सवलत आणि विशेष कोट्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जवळ बाळगा. ई-पास किंवा पॅसेंजर ऑर्डर तिकीट प्रवासापूर्वी अधिकृत ट्रॅव्हल ऑथॉरिटीमध्ये बदलून घ्या. तिकीट चेकिंग अधिकाऱ्यांना सहकार्य करा आणि त्यांनी मागितलेली कागदपत्रे वेळेवर दाखवा. रिझर्व्हेशनचा गैरवापर, सवलतींचा चुकीचा वापर आणि रेल्वे पासचा गैरवापर रोखणे हा या महिनाभर चालणाऱ्या विशेष चेकिंग मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.