
Electric Vehicle Charging in Winter : थंडीच्या दिवसांत इलेक्ट्रिक कारची बॅटरी वेगाने ड्रेन होणे, चार्जिंगला जास्त वेळ लागणे आणि रेंज कमी होणे ही सामान्य समस्या आहे. पण थंडीच्या वातावरणात काही चुकीच्या चार्जिंग सवयी केल्यास बॅटरीची परफॉर्मन्सच नव्हे तर तिचे आयुष्यही कमी होऊ शकते. इलेक्ट्रिक व्हेइकल्समध्ये लिथियम-आयन बॅटरी असते आणि तापमानाचा तिच्या वर्तनावर थेट परिणाम होतो. त्यामुळे हिवाळ्यात चार्जिंग करताना योग्य पद्धतींचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
इलेक्ट्रिक कार थंड तापमानात रात्रभर पार्क झाली असेल तर तिची बॅटरी ‘कोल्ड स्टेट’मध्ये असते. अशावेळी थेट फास्ट चार्जिंग सुरू केल्यास बॅटरी सेल्सवर ताण येतो. लिथियम-आयन बॅटरी कमी तापमानात आयन मूव्हमेंट कमी करते, त्यामुळे फास्ट करंट घेताना सेल डॅमेजची शक्यता वाढते. त्यामुळे कार आधी काही मिनिटे ‘प्री-कंडिशन’ करून घ्यावी किंवा हळूहळू तापमान वाढू द्यावे. काही कारमध्ये ऑटोमॅटिक बॅटरी वॉर्मिंग सिस्टमही असते जी चार्जिंगपूर्वी बॅटरी योग्य तापमानात आणते.
हिवाळ्यात लोकांना वाटते की रेंज कमी मिळते म्हणून जास्त वेळा फास्ट चार्जिंग करावे. पण ही सवय धोकादायक ठरू शकते. फास्ट चार्जिंग बॅटरीमध्ये जास्त उष्णता निर्माण करते आणि थंड वातावरणात हा तापमानातील बदल बॅटरीच्या सेल्सला अधिक घातक ठरतो. थंडीमध्ये AC स्लो चार्जिंग करणे उत्तम मानले जाते. हे बॅटरीला कमी ताण देऊन सुरक्षितपणे चार्ज करते. आठवड्यातून फक्त १–२ वेळाच फास्ट चार्जिंग करणे योग्य.
थंडीमध्ये बॅटरीचा डिस्चार्ज दर वाढतो. जर बॅटरी १०% पेक्षा खाली गेली तर सेल्स ‘डीप डिस्चार्ज’ झोनमध्ये जातात आणि यामुळे बॅटरीचे नुकसान होऊ शकते. विशेषज्ञांच्या मते हिवाळ्यात बॅटरी नेहमी २०–८०% या श्रेणीत ठेवणे सर्वोत्तम. यामुळे सेल्सवर अतिरिक्त दबाव पडत नाही आणि बॅटरीचे आयुष्य लक्षणीय वाढते.
ईव्ही कारमध्ये “बॅटरी थर्मल मॅनेजमेंट सिस्टम” असते. गाडी चालवल्यानंतर बॅटरीचे तापमान वाढलेले असते, तेव्हा चार्जिंग करणे सर्वात सुरक्षित असते. थंड बॅटरीपेक्षा चालवल्यानंतरची गरम बॅटरी करंट अधिक प्रभावीपणे स्वीकारते. त्यामुळे घरापर्यंत पोहोचून लगेच कार चार्जिंगला लावण्याची सवय ईव्हीला फायदेशीर असते.
गाडी रात्री बाहेर पार्क केल्याने बॅटरी अत्यंत थंड होते आणि तिचा नेहमीचा वॉर्म-अप टाइम वाढतो. शक्यतो गरम गॅरेजमध्ये किंवा शेडमध्ये कार पार्क करावी. यामुळे तापमान स्थिर राहते आणि बॅटरीचा चार्जिंग परफॉर्मन्सही सुधारतो. काही ईव्हीमध्ये "Scheduled Charging" फीचर असते जे कमी तापमानात बॅटरी हळूहळू गरम करत चार्जिंग सुरू करते.