पृथ्वीवर सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी कार्बन अत्यंत महत्त्वाचा आहे. हा कार्बन ४.५ अब्ज वर्षांपूर्वी अवकाशातून पडलेल्या प्राचीन उल्कांमधून पृथ्वीच्या गाभ्यात (Core) साचला असावा, असे एका नवीन अभ्यासात समोर आले आहे.
पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी कार्बन (Carbon) खूपच मूलभूत आहे. पण, हा कार्बन पृथ्वीवर पहिल्यांदा कुठून आला, या प्रश्नाचं उत्तर शास्त्रज्ञ अजूनही शोधत आहेत. आता हवाई बेटावरील ज्वालामुखीच्या खडकांवर केलेल्या एका नवीन अभ्यासानुसार, पृथ्वीच्या गाभ्यातून (Core) ४.५ अब्ज वर्षे जुना कार्बन गळत आहे आणि तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर येत असावा, अशी आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
24
पृथ्वीच्या खोलातून येणारे पुरावे
कोलंबिया विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील एका संशोधन पथकाने हवाईमधील किलावेआ (Kīlauea) आणि टँटलस रिफ्ट (Tantalus Rift) ज्वालामुखीच्या खडकांचा अभ्यास केला. 'नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस' (PNAS) या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात, मॅग्मामध्ये (Magma) तयार झालेल्या सूक्ष्म स्फटिकांमध्ये अडकलेल्या वायूच्या थेंबांची तपासणी करण्यात आली.
सध्याच्या तंत्रज्ञानामुळे पृथ्वीच्या गाभ्यामध्ये थेट जाऊन संशोधन करणं शक्य नाही. पण, पृथ्वीचा गाभा आणि आवरण (Mantle) यांच्यातून वर येणारे उष्ण खडकांचे स्तंभ (Mantle plumes), ज्वालामुखीच्या माध्यमातून आतली खनिजे बाहेर आणतात.
34
वेगळे कार्बन आयसोटोप
साधारणपणे पृथ्वीच्या आवरणातील कार्बनच्या आयसोटोपची पातळी (-५ ते -७ पर मिल) एका विशिष्ट मर्यादेत असते. पण, किलावेआ ज्वालामुखीच्या खडकांमध्ये सापडलेला कार्बन आयसोटोप (-१ पर मिल) नेहमीपेक्षा खूपच जड होता. हा कार्बन पृथ्वीच्या गाभ्यातून गळत असल्याची दाट शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
या दुर्मिळ कार्बनच्या पुराव्याची तुलना शास्त्रज्ञांनी ४.५ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला तयार होत असतानाच्या 'कार्बनेसियस कॉन्ड्राइट्स' (Carbonaceous chondrites) नावाच्या प्राचीन उल्कांशी केली. तेव्हा या दोन्ही गोष्टी मिळत्याजुळत्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
पृथ्वीच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात, अवकाशातून पडलेल्या या कार्बनयुक्त उल्का पृथ्वीच्या खोल गाभ्यात साचल्या असाव्यात. त्यानंतर अब्जावधी वर्षे त्या हळूहळू वर सरकत राहिल्या आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून पृथ्वीच्या पृष्ठभागावर आल्या. आज हाच कार्बन मानवासह सर्व सजीवांच्या शरीराचा एक भाग बनला असावा, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .