दिवसाला फक्त दोन सिगारेट ओढल्याने आरोग्याला काहीही होत नाही, अशा भ्रमात अनेकजण असतात. पण महिनाभर रोज दोन सिगारेट ओढल्यास काय होतं माहिती आहे का? नसेल तर हा लेख वाचा.
मी फक्त एक किंवा दोन सिगारेट ओढते. त्याने काय होतयं, असं मानणारे बरेच आहेत. कॉर्पोरेट आणि मीडिया क्षेत्रात हा समज जास्त आहे. याला नियंत्रित किंवा प्रासंगिक धूम्रपान म्हणतात. थेंबे थेंबे तळे साचे, त्याप्रमाणे दिवसातील दोन सिगारेटही तुमच्या जीवासाठी धोकादायक आहेत. कमी प्रमाणात धूम्रपान केल्यानेही शरीरावर गंभीर परिणाम होतात, असं तज्ज्ञ मानतात.
28
निकोटीनचे व्यसन कसे लागते? जाणून घ्या
सिगारेटमधील निकोटीन गतीने काम करते. याचा थेट परिणाम मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमवर होतो. तुम्ही थोड्या प्रमाणात निकोटीन घेतले तरी ते तुम्हाला व्यसनाच्या दिशेने ढकलते. सुरुवातीला सिगारेट ओढण्याची इच्छा सौम्य असते. हळूहळू, ही सवय व्यसनात बदलते. फक्त दोन सिगारेट कधी गरज बनल्या, हे कळतही नाही.
38
हृदयावर किती परिणाम होतो?
तुम्ही दिवसाला ओढत असलेल्या दोन सिगारेटचा सर्वात आधी परिणाम हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होतो. निकोटीनमुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब तात्पुरता वाढतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे हृदयाचे काम वाढते. धूम्रपानामुळे रक्त घट्ट आणि चिकट होते. रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.
दिवसाला दोन सिगारेट ओढणे फुफ्फुसांसाठीही धोकादायक आहे. सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसात जळजळ होते आणि कफ जास्त तयार होतो. महिनाभर रोज दोन सिगारेट ओढल्यास घशात खवखव, हलका खोकला, छातीत जडपणा किंवा चालताना धाप लागणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात.
58
रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते
सिगारेटमधील विषारी रसायने शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढवतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे कोणताही आजार झाल्यास शरीर लवकर बरे होत नाही.
68
त्वचेला होणारे नुकसान
रोज दोन याप्रमाणे महिनाभर सिगारेट ओढल्यास त्वचेवर परिणाम दिसू लागतो. रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. जखमा बऱ्या व्हायला खूप वेळ लागतो. हिरड्यांमध्ये जळजळ किंवा सूज येऊ शकते.
78
वेळेवर सावध झाल्यास आरोग्य उत्तम
तुम्ही फक्त एक महिना दिवसाला दोन सिगारेट ओढून नंतर पूर्णपणे सोडल्यास, कायमस्वरूपी नुकसान टाळता येते. तुम्ही जितक्या लवकर धूम्रपान सोडाल, तितका शरीराला बरे होण्यासाठी वेळ मिळतो. पण, पेशींच्या पातळीवर नुकसान होते. फुफ्फुस आणि रक्तवाहिन्यांमध्ये समस्या सुरू होतात. दमा, हृदयरोग किंवा अनुवांशिक धोका असलेल्या लोकांमध्ये याचे परिणाम जास्त दिसतात.
88
लाइट सिगारेट
कमी टार असलेली सिगारेट आरोग्याला हानी पोहोचवत नाही, असा लोकांचा समज आहे. पण लाइट सिगारेट, विडी या सर्वांमध्ये निकोटीन असते आणि ते आरोग्यासाठी हानिकारकच आहे. दिवसाला चार असो वा एक, धूम्रपान आरोग्यासाठी धोकादायक असल्याने या व्यसनातून लवकर बाहेर पडणेच उत्तम.