
श्रीलंकाने बांगलादेशचा पराभव केला : आशिया चषक २०२५ च्या गट ब मध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात शनिवारी सामना झाला. अबू धाबीतील शेख जायद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला.
हा श्रीलंकेचा पहिला सामना होता, तर बांगलादेशने हाँगकाँगवर विजय मिळवून उत्साहाने सुरुवात केली होती. २०२२ मध्ये टी२० आशिया चषक जिंकणारा श्रीलंका यावेळीही जोरदार तयारीसह मैदानात उतरला आहे. “नाग आणि मुंगुस” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन संघांमधील सामना गट ब मधील सुपर फोरच्या संधींसाठी महत्त्वाचा होता.
या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चरित असलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. वनिंदू हसरंगाचे संघात पुनरागमन त्यांच्यासाठी बळकटीचे ठरले. बांगलादेशने संघात एक बदल करत टास्किन अहमदच्या जागी शोरीफुल इस्लामला संधी दिली.
बांगलादेशची फलंदाजी अपयशी ठरली. श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांनी सलग दोन मेडन विकेट ओव्हर टाकल्या. टी२० च्या इतिहासात असे दुसऱ्यांदा घडले. नुवान तुषाराने पहिल्या ओव्हरमध्ये तनझीद हसनला डकवर बाद केले. दुसऱ्या ओव्हरमध्ये चमीरानं इमोनला बाद केले. पाचव्या ओव्हरमध्ये ह्रिदॉय रनआउट झाला, तर आठव्या ओव्हरमध्ये महेदी हसन हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार लिटन दास २६ धावा करून १० व्या ओव्हरमध्ये बाद झाला.
मात्र ५३/५ अशी अवस्था असताना जाकिर अली (३२*) आणि शमीम हुसेन (४६*) यांनी संघाला सावरले. दोघांमध्ये ८६ धावांची अविजित भागीदारी झाली. बांगलादेशने २० ओव्हरमध्ये १३९/५ धावा केल्या. श्रीलंकेकडून हसरंगाने २/२५, तुषाराने १/१७ आणि चमीराने १/२७ अशा विकेट्स घेतल्या. पथिरानाने ४२ धावा दिल्या पण एकही विकेट घेऊ शकला नाही.
१४० धावांचे लक्ष्य श्रीलंकेने आक्रमक खेळीने गाठले. दुसऱ्या ओव्हरमध्ये कुसल मेंडिस (२) लवकर बाद झाल्याने काहीसा दबाव निर्माण झाला. पण पथुम निसंकाने उत्कृष्ट खेळी केली. ३४ चेंडूत ५० धावा करत तो सर्वात जलद २००० टी२० धावा पूर्ण करणारा श्रीलंकेचा फलंदाज ठरला. कुसल परेराचा विक्रम (७६ डाव) मोडत निसंकाने केवळ ६८ डावांमध्ये हा टप्पा गाठला.
दुसरीकडे कमिल मिशारानेही चांगली कामगिरी केली. त्याला एका धावेवर बाद करण्याची संधी हुकली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत त्याने ३२ चेंडूत ४६* धावा केल्या. त्याच्या फटक्यांनी संघाला बळ मिळाले. निसंका आणि मिशारा या जोडीने केवळ ७ ओव्हरमध्ये ५० धावांची भागीदारी केली.
श्रीलंकेने १४.४ ओव्हरमध्ये १४०/४ धावा करत ६ गडी राखाऊन विजय मिळवला. अजून ३२ चेंडू शिल्लक असताना विजय मिळाल्याने त्यांचा नेट रन रेट वाढला. गट ब मध्ये अफगाणिस्तानसोबतची स्पर्धा आता रंजक झाली आहे. दुसरीकडे, हाँगकाँगवर विजय मिळवलेल्या बांगलादेशवर या पराभवामुळे दबाव आला आहे. सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आता अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवावा लागेल.
बांगलादेश XI: पार्वेज हुसेन इमोन, तनझीद हसन, लिटन दास (कर्णधार/यष्टीरक्षक), तौहीद ह्रिदॉय, जाकिर अली, शमीम हुसेन, महेदी हसन, रिशाद हसन, तनसिम हसन साकिब, शोरीफुल इस्लाम, मुस्तफिजूर रहमान.
श्रीलंका XI: पथुम निसंका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कमिल मिशारा, कुसल परेरा, चरित असलंका (कर्णधार), दासुन शनाका, कमिंदू मेंडिस, वनिंदू हसरंगा, दुष्मंता चमीरा, मथीशा पथिराना, नुवान तुषारा.