
भारत विरुद्ध यूएई एशिया कप २०२५: भारत आणि यूएई यांच्यातील एशिया कपचा दुसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय गोलंदाजांनी असा कहर केला की संपूर्ण यूएई संघ ५७ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाजांसमोर यूएईचा एकही फलंदाज टिकू शकला नाही आणि पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले. भारताच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर प्रतिस्पर्ध्यांनी दिलेले आव्हान भारतीय फलंदाजांनी अगदी लीलया पार करत सामना ९ विकेट्स राखून जिंकला.
भारतीय संघाने विजयासाठी लागणारे धावसंख्येचे लक्ष्य केवळ २७ चेंडूत पूर्ण केले. अभिषेक शर्माने झळकावलेल्या ३० धावा भारतीय डावाला वेग देऊन गेल्या. मात्र तो बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलने नाबाद २० धावा करत डाव स्थिरावला. संजू सॅमसननेही नाबाद ७ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने आशिया कपमध्ये आपले पहिले दोन गुण खात्यात जमा केले असून पुढील लढतींसाठी संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
पहिल्या डावाबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून यूएईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानुसार, यूएईच्या सलामीवीरांनी जोरदार सुरुवात केली. सुरुवातीच्या दोन षटकांत दोन्ही सलामीवीरांनी मिळून १६ धावा जोडल्या आणि असे वाटले की हा संघ मोठी धावसंख्या उभारेल, पण तेव्हाच जसप्रीत बुमराहने त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या.
जसप्रीत बुमराहने ३.४ षटकांत २६ धावांच्या मोबदल्यात पहिला बळी अलीशान शरफू २२ धावांवर बाद केला. त्यानंतर २९ धावांवर संघाचा दुसरा बळी पडला आणि त्यानंतर एकामागून एक फलंदाज येत राहिले आणि जात राहिले. भारतीय गोलंदाजांनी यूएईच्या कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकू दिले नाही. यूएईच्या दोन फलंदाजांना वगळता कोणीही दहाचा आकडा ओलांडू शकले नाही. फलंदाजीवर नजर टाकली तर, अलीशान शरफू २२, मोहम्मद वसीम १९, एमजेड खान २, आर चोपड़ा ३, आसिफ खान २, हर्षित कौशिक २, ध्रुव प्राशर १, एसएस कंग १, हैदर अली १, जुनैद सिद्दीकी ० आणि एमआर खान ०* धावा केल्या.
दरम्यान, भारतीय गोलंदाजीत फिरकीपटू कुलदीप यादवने गोलंदाजीत धुमाकूळ घातला. त्याने संघातर्फे सर्वाधिक २.१ षटकांत ७ धावा देऊन ४ बळी घेतले. त्याशिवाय शिवम दुबेने २ षटकांत ४ धावा देऊन ३ बळी घेतले. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनाही प्रत्येकी १ बळी मिळाला. एशिया कप २०२५ मध्ये पहिला विजय मिळवण्यासाठी भारताला २० षटकांत ५८ धावा करायच्या आहेत.