
दुबई (UAE) येथे सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये पाकिस्तानचा क्रिकेट संघ एक अत्यंत स्पर्धात्मक संघ म्हणून उतरतो आहे. १२ सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा ओमानविरुद्ध सामना झाला. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी म्हणजचे आज भारताशी सामना होणार असून १७ सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध त्यांचा शेवटचा लीग सामना असेल. यानंतर सुपर-४ टप्पा सुरू होईल.
गेल्या वर्षी टी२० विश्वचषकात भारत आणि यूएसएकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानला लवकर बाहेर पडावे लागले होते. त्या वेळेपासून पाकिस्तानने २७ टी २० सामने खेळले आहेत. त्यापैकी १३ विजय आणि १४ पराभव अशी कामगिरी झाली आहे. त्यांनी आठ मालिका खेळल्या असून चार जिंकल्या आणि चार गमावल्या आहेत. घरच्या मैदानावर बांगलादेशवर ३-० अशी मालिका जिंकणे हे त्यांचे विशेष यश ठरले. झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि यूएई यांच्याविरुद्धही त्यांनी विजय मिळवले. पण न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध घराबाहेरील सामने जिंकणे पाकिस्तानसाठी कठीण ठरले.
पाकिस्तानकडे अनेक सकारात्मक बाबी आहेत :
रिझवान-बाबरवरील अवलंबित्व कमी : बराच काळ पाकिस्तानची फलंदाजी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानवरच अवलंबून होती. मात्र आता साहिबजादा फरहान, सैम अयूब, हसन नवाज, मोहम्मद हारिस आणि फखर जमान यांसारखे तरुण फलंदाज अधिक स्फोटक शैलीत खेळत आहेत. त्यामुळे संघाचा एकूण स्ट्राइक रेट सुधारला आहे.
सैम अयूबचा उदय : सुरुवातीला संघर्ष केला असला तरी अयूबने सातत्य दाखवले आहे. त्याने अलीकडील १८ डावांत ५०७ धावा केल्या आहेत, जवळपास १४७ च्या स्ट्राइक रेटने, तसेच चार अर्धशतके झळकावली आहेत.
मोहम्मद नवाजचा फॉर्म : या फिरकीपटूने या वर्षी ११ सामन्यांत २० बळी घेतले आहेत. यूएईतील तिरंगी मालिकेत त्याने मालिकावीराचा मान पटकावला.
गोलंदाजीची ताकद : पाकिस्तानने कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांमध्ये सर्वाधिक १८१ बळी घेतले असून त्यांचा स्ट्राइक रेट भारतानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे. फिरकी व वेगवान गोलंदाज यांचे संतुलित मिश्रण त्यांच्याकडे आहे.
यूएईचा अनुभव : अलीकडेच शारजाहमध्ये तिरंगी मालिका खेळल्यामुळे संघाला स्थानिक परिस्थितीचा अनुभव मिळाला आहे, जे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
सकारात्मक गोष्टींसोबत काही कमकुवत दुवेही आहेत :
कमकुवत फलंदाजी सरासरी : पाकिस्तानची एकत्रित फलंदाजी सरासरी १९.८४ इतकी असून कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांमध्ये ती सर्वात वाईट आहे.
सलमान आघाची खराब फॉर्म : कर्णधार असूनही त्याने २३ डावांत फक्त ४८९ धावा केल्या आहेत, स्ट्राइक रेट फक्त ११६.४२ आहे.
इकॉनॉमी रेटची समस्या : पाकिस्तानचा ८.१९ इकॉनॉमी रेट सर्व संघांमध्ये ओमाननंतर दुसऱ्या क्रमांकाचा वाईट आहे.
शहीन शाह आफ्रिदीची फॉर्मची लढाई : एकेकाळचा धडाकेबाज गोलंदाज अलीकडे फारसा प्रभाव दाखवू शकलेला नाही. १५ सामन्यांत फक्त १२ बळी आणि इकॉनॉमी ८.३६ आहे.
एकंदरीत पाहता, पाकिस्तान संघात प्रतिभा, दमदार गोलंदाजी आणि स्फोटक तरुण फलंदाज यांची कमतरता नाही. मात्र सातत्य, फॉर्म आणि दबावाखाली खेळण्याची क्षमता या बाबतीत अजून सुधारणा करण्याची गरज आहे. जर ते या उणिवा भरून काढू शकले, तर आशिया कपमध्ये पाकिस्तान नक्कीच उपांत्य फेरीत पोहोचण्याचा आणि अंतिम फेरी गाठण्याचा दावेदार ठरू शकतो.