
Pakistan Threatens to Boycott T20 World Cup : T20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात जाणार नाही, असा हट्ट धरणाऱ्या बांगलादेशला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्पर्धेतून बाहेर काढले आहे. बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला संधी देण्यात आली आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून वगळल्यापासून सुरू झालेला बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा वाद अखेर त्यांच्याच अंगलट आला आहे.
T20 वर्ल्ड कपमधून बांगलादेशला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (ICC) बाहेर काढल्यानंतर, त्या देशावर अन्याय झाला आहे असे म्हणत पाकिस्तान त्यांच्या समर्थनार्थ उभा राहिला आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, त्यांनाही वर्ल्ड कपमध्ये खेळण्यात रस नाही आणि ते स्पर्धेतून माघार घेऊ शकतात, अशी पोकळ धमकी आयसीसीला दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आमचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देशाबाहेर आहेत. ते परत आल्यावर आम्ही त्यांच्यासमोर हा विषय मांडू. आम्ही T20 वर्ल्ड कपमध्ये खेळायचे की नाही, याचा निर्णय आमचे सरकार घेईल.'
'आमचे सरकार जो निर्णय घेईल, तोच अंतिम असेल. वर्ल्ड कपमध्ये खेळायला जाऊ नका, असे पंतप्रधानांनी सांगितले तर आम्ही जाणार नाही, आयसीसी दुसऱ्या संघाला आमंत्रित करू शकते,' असे नक्वी म्हणाले. बांगलादेशला एक मजबूत क्रिकेट देश असल्याचे सांगत नक्वी यांनी प्रश्न केला की, 'एका देशाने क्रिकेट जगतावर आपले नियंत्रण ठेवले आहे. आयसीसी त्यांच्या इशाऱ्यावर चालते. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येणार नाही म्हटल्यावर आयसीसीने ठिकाण बदलले, मग बांगलादेशसाठी तशीच व्यवस्था का केली नाही?'
7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे.
जर पाकिस्तानने वर्ल्ड कपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला, तर आयसीसी रँकिंगच्या आधारावर युगांडाला स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. रँकिंगमध्ये युगांडा 21 व्या स्थानावर आहे.
शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत फक्त पाकिस्तानने बांगलादेशच्या बाजूने मतदान केले. उर्वरित 14 सदस्य राष्ट्रांनी सांगितले की, जर बांगलादेश भारतात गेला नाही, तर त्यांना बाहेर काढणेच योग्य आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला. याच कारणामुळे, बांगलादेशवर अन्याय झाला आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्हीही वर्ल्ड कप खेळणार नाही, असे सांगून पाकिस्तान आपली प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.