
मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे. तिन्ही खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटी रुपये बक्षीस देण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय मुंबईचे असलेले भारतीय संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनाही २२.५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
या स्पर्धेत स्मृती मानधना भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद शतकाने भारताच्या अविस्मरणीय विजयाचा मार्ग मोकळा केला होता. उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात राधा यादव भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होती.
रविवारी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून भारताने पहिले विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात स्मृती मानधनाने ४५ धावा केल्या, तर जेमिमाने २४ धावा केल्या होत्या. यापूर्वी बीसीसीआयने विजेत्या भारतीय संघाला ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. हे बक्षीस आयसीसीकडून विजेत्या संघाला मिळणाऱ्या ३९.७८ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त होते. महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वोच्च बक्षीस रक्कम आहे.
भारतीय खेळाडू रेणुका ठाकूरला हिमाचल प्रदेश सरकारने आणि भारतीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडला मध्य प्रदेश सरकारने प्रत्येकी १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. विजेत्या भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमनज्योत कौर यांना पंजाब सरकारने प्रत्येकी ११ लाख रुपये आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीश बाली यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.