
Jitesh Sharma To Captain Indian Squad : या महिन्यात १४ ते २३ नोव्हेंबर दरम्यान कतारमध्ये होणाऱ्या रायझिंग स्टार्स आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय यष्टीरक्षक जितेश शर्मा या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे, संजू सॅमसनचा संघात विचार करण्यात आलेला नाही. टी-२० विश्वचषक जवळ आलेला असताना निवड समिती संजूऐवजी जितेशला अधिक महत्त्व देत असल्याचे यावरून दिसून येते. विशेष म्हणजे जितेश शर्मा मुळचा अमरावतीचा असून विदर्भाकडून खेळतो.
चौदा वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीचा संघात सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी धमाकेदार फलंदाजी करणारा प्रियांश आर्य संघातील दुसरा सलामीवीर आहे. रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबचे नेतृत्व करणारा नमन धीर उपकर्णधार आहे. मुंबईचा खेळाडू सुर्यांश शेडगे, नेहाल वढेरा आणि रमणदीप सिंग यांचाही संघात समावेश आहे. अभिषेक पोरेल संघातील दुसरा यष्टीरक्षक आहे. पाच राखीव खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय संघ ब गटात आहे, ज्यात ओमान, यूएई आणि पाकिस्तान अ संघाचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना १४ तारखेला यूएईविरुद्ध होईल. १६ तारखेला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. १८ तारखेला भारत ओमानशी भिडणार आहे. २१ तारखेला उपांत्य फेरीचे सामने आणि २३ तारखेला अंतिम सामना होईल.
प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, नमन धीर (उपकर्णधार), सुर्यांश शेडगे, जितेश शर्मा (कर्णधार), रमणदीप सिंग, हर्ष दुबे, आशुतोष सिंग शर्मा, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, विजयकुमार वैशाख, अभिषेक पोरेल, सुयश शर्मा, युद्धवीर सिंग चरक.
राखीव खेळाडू: गुरनूर सिंग ब्रार, कुमार कुशाग्र, तनुष कोडियान, समीर रिझवी, शेख रशीद.