
India T20 World Cup Semifinal Qualification : T20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 फेरीत टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात मोठा धक्का बसला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 रन्सनी पराभव केला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग आता खूपच अवघड झाला आहे. या पराभवामुळे पॉईंट्स टेबलमध्ये भारताची स्थिती कमजोर झाली असून, पुढील सामने जिंकणं अत्यंत महत्त्वाचं झालं आहे.
या पराभवानंतर आता भारताला सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धचे उरलेले दोन्ही सामने जिंकावेच लागतील. जर भारताने एकच सामना जिंकला, तर सेमीफायनलचं भवितव्य दुसऱ्या सामन्यांच्या निकालांवर आणि नेट रन रेटवर (NRR) अवलंबून असेल.
जर टीम इंडियाने उरलेले दोन्ही सामने जिंकले, तर त्यांचे ४ पॉईंट्स होतील. सेमीफायनलसाठी एवढे पॉईंट्स पुरेसे ठरू शकतात. पण, जर ग्रुपमधील इतर दोन टीम्सचेही ४-४ पॉईंट्स झाले, तर अडचण वाढेल. असं तेव्हाच होऊ शकतं, जेव्हा दक्षिण आफ्रिका उरलेल्या सामन्यांपैकी फक्त एक जिंकेल आणि वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यातील विजेता संघ दक्षिण आफ्रिकेला हरवेल. अशा परिस्थितीत नेट रन रेट (NRR) खूप महत्त्वाचा ठरेल आणि त्यावरच सेमीफायनलचं तिकीट निश्चित होईल.
जर भारताने उरलेल्या दोन सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला, तर टीम इंडियाला सेमीफायनलसाठी दुसऱ्या टीम्सच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. अशावेळी, दक्षिण आफ्रिकेने त्यांचे उरलेले सर्व सामने जिंकावेत, अशी प्रार्थना करावी लागेल. तसेच, भारताला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याच्या विजेत्या टीमला हरवावं लागेल. या परिस्थितीत भारत, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या तिन्ही टीम्सचे २-२ पॉईंट्स होऊ शकतात. मग सेमीफायनलचा निर्णय पूर्णपणे नेट रन रेटवर (NRR) अवलंबून असेल.
२३ फेब्रुवारी: वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे – मुंबई
२६ फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज – अहमदाबाद
२६ फेब्रुवारी: भारत विरुद्ध झिम्बाब्वे – चेन्नई
१ मार्च: दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे – दिल्ली
१ मार्च: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – कोलकाता
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा बॅटिंग करताना २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावून १८७ रन्स केले. त्यांच्याकडून डेविड मिलरने ६३ रन्सची खेळी केली, तर डेवाल्ड ब्रेविसने ४५ रन्सचं महत्त्वाचं योगदान दिलं. भारताकडून जसप्रीत बुमराहने फक्त १५ रन्स देत ३ विकेट्स घेतल्या, पण तो आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखू शकला नाही.
१८८ रन्सच्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय टीम सुरुवातीपासूनच दबावात दिसली. एकही बॅट्समन मोठी खेळी करू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जेन्सनने ४ विकेट्स घेत भारतीय बॅटिंगचं कंबरडं मोडलं. अखेर संपूर्ण टीम १११ रन्सवर ऑलआऊट झाली.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.