IND vs SA T20: टीम इंडियाचा दारुण पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 76 धावांनी दणदणीत विजय

Published : Feb 22, 2026, 10:56 PM IST
Indian team lost by 76 runs

सार

IND vs SA T20: T20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी मोठा पराभव केला. 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ फक्त 111 धावांवर गारद झाला.

अहमदाबाद: T20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी पराभव केला. 188 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 18.5 ओव्हर्समध्ये फक्त 111 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून फक्त शिवम दुबेने (37 चेंडूत 42 धावा) थोडाफार प्रतिकार केला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सनने चार आणि केशव महाराजने तीन विकेट्स घेत भारताच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं. कॉर्बिन बॉशने दोन विकेट्स घेतल्या. याआधी, टॉस जिंकून बॅटिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला डेव्हिड मिलर (35 चेंडूत 63), डेवाल्ड ब्रेविस (29 चेंडूत 45) आणि ट्रिस्टन स्टब्स (24 चेंडूत नाबाद 44) यांच्या खेळीमुळे मोठी धावसंख्या उभारता आली. भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन आणि अर्शदीप सिंगने दोन विकेट्स घेतल्या.

188 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये किशन मार्करमच्या चेंडूवर रायन रिकेल्टनकडे कॅच देऊन बाद झाला. पुढच्याच चेंडूवर तिलक वर्मा (1) सुद्धा यान्सनला पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात क्विंटन डी कॉककडे कॅच देऊन परतला. अभिषेक शर्मा सुरुवातीपासूनच चाचपडत होता. त्याने रबाडाला एक सिक्स आणि एक फोर मारून आत्मविश्वास मिळवण्याचा प्रयत्न केला, पण यान्सनच्या स्लो बॉलवर तो फसला. कॉर्बिन बॉशने त्याचा जबरदस्त कॅच घेतला. यामुळे भारताची अवस्था 3 बाद 26 झाली.

अक्षर पटेलच्या जागी टीममध्ये आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने (11) निराशा केली. त्यानंतर सूर्यकुमार यादवला (18) बॉशने बाद केलं आणि भारताची अवस्था 5 बाद 51 झाली. 15 व्या ओव्हरमध्ये केशव महाराजने तर कहरच केला. त्याने एकाच ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या (18), रिंकू सिंग (0) आणि अर्शदीप सिंग (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. विशेष म्हणजे, हे तिन्ही कॅच ट्रिस्टन स्टब्सने घेतले. शिवम दुबेच्या खेळीमुळे फक्त पराभवाचं अंतर कमी झालं. 19 व्या ओव्हरमध्ये दुबे आणि बुमराह (0) बाद झाले. वरुण चक्रवर्ती (0) नाबाद राहिला.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही खराब झाली होती. दुसऱ्याच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने क्विंटन डी कॉकचा (6) त्रिफळा उडवला. तिसऱ्या ओव्हरमध्ये एडन मार्करम (4) अर्शदीप सिंगच्या बॉलिंगवर हार्दिक पांड्याकडे कॅच देऊन बाद झाला. बुमराहच्या स्लो बॉलवर रायन रिकेल्टनही फसला आणि शिवम दुबेकडे कॅच देऊन बाद झाला. त्यामुळे 4 ओव्हर्समध्ये आफ्रिकेची अवस्था 3 बाद 20 झाली होती.

यानंतर ब्रेविस आणि मिलर यांनी 97 धावांची पार्टनरशिप करून डाव सावरला. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असतानाच शिवम दुबेने ब्रेविसला बाद करून भारताला यश मिळवून दिलं. त्यानंतर स्टब्स आणि मिलर यांनी 35 धावा जोडल्या. ही जोडी धोकादायक वाटत असतानाच वरुण चक्रवर्तीने मिलरला बाद केलं आणि सामन्याचं चित्र बदललं. 200 पार जाईल असं वाटत असताना आफ्रिकेचा संघ कमी धावसंख्येवर रोखला गेला. यादरम्यान मार्को यान्सन (2) आणि कॉर्बिन बॉश (5) सुद्धा बाद झाले. बॉशला बुमराहने स्वतःच्याच बॉलिंगवर कॅच घेऊन बाद केलं.

शेवटच्या ओव्हर्समध्ये स्टब्सने केलेल्या फटकेबाजीमुळे आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. स्टब्ससोबत कागिसो रबाडा (0) नाबाद राहिला. शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये आफ्रिकेला फक्त 43 धावा करता आल्या आणि त्यांनी 7 विकेट्स गमावल्या. भारताने नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातील संघात कोणताही बदल केला नव्हता. वॉशिंग्टन सुंदरला संघात कायम ठेवण्यात आलं, तर अक्षर पटेल आणि संजू सॅमसनला संधी मिळाली नाही.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कशी पोहोचू शकणार? जाणून घ्या गणित
Jasprit Bumrah: बुमराहचा डबल स्ट्राईक, पॉवरप्लेमध्येच दक्षिण आफ्रिकेची दाणादाण!