
अहमदाबाद: टी२० वर्ल्डकपच्या सुपर ८ फेरीत भारतासमोर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेने पॉवरप्लेमध्येच आपल्या तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. ताजं वृत्त हाती आलं तेव्हा, ६ ओव्हर्समध्ये आफ्रिकेची धावसंख्या ३ बाद ४१ अशी होती. भारताकडून जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत दोन विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप सिंगला एक विकेट मिळाली. सध्या डेवाल्ड ब्रेविस (४) आणि डेव्हिड मिलर (१८) क्रीजवर आहेत.
भारतीय संघाने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातील आपला संघ कायम ठेवला आहे. वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळालं असून, अक्षर पटेल आणि संजू सॅमसनला मात्र संधी मिळालेली नाही.
सुरुवातीपासूनच आफ्रिकेची फलंदाजी गडगडली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने क्विंटन डी कॉकचा (६) त्रिफळा उडवून भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पुढच्याच, म्हणजे तिसऱ्या ओव्हरमध्ये कर्णधार एडन मार्करमही (४) तंबूत परतला. अर्शदीप सिंगच्या बॉलवर मिड-ऑफला उभ्या असलेल्या हार्दिक पांड्याने त्याचा सोपा कॅच घेतला. त्यानंतर आलेला रायन रिकेल्टनही बुमराहच्या गोलंदाजीसमोर तग धरू शकला नाही. बुमराहच्या स्लोअर बॉलला ओळखण्यात तो चुकला आणि मिड-ऑफला उभ्या असलेल्या शिवम दुबेच्या हातात कॅच देऊन बसला.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघात संजू सॅमसनला स्थान मिळालेलं नाही, तर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी आपलं स्थान कायम राखलं आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने संघात चार बदल केले आहेत. मार्को यानसेन, लुंगी एनगिडी आणि केशव महाराज संघात परतले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
भारत: अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका: एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यानसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.