
Abhishek-Gill vs Shaheen-Rauf: आशिया कप २०२५ सुपर फोर सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून शानदार विजय मिळवला. दुबईत झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने २० षटकांत ५ गडी गमावून १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १८.५ षटकांतच १७४ धावा करत सामना जिंकला. भारतासाठी अभिषेक शर्मा (७४ धावा) आणि शुभमन गिल (४७ धावा) यांनी महत्त्वपूर्ण खेळी करत विजयाचा पाया रचला. अखेर भारताने ७ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठत दमदार कामगिरी केली. यादरम्यान खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांना बॅट आणि तोंडानेही सडेतोड उत्तर दिले.
अभिषेकने डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत शाहीन आफ्रिदीचा माज उतरवला. शाहीनने अभिषेकला पहिल्या चेंडूवर बाऊन्सर टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्याने अप्रतिम पुल शॉट खेळून चेंडू फाइन लेगच्या वरून स्टँडमध्ये पाठवला. पाकिस्तानच्या या प्रमुख गोलंदाजाला या तरुण भारतीय फलंदाजाने कोणतीही संधी दिली नाही आणि मागील सामन्याप्रमाणे या सामन्यातही पहिल्याच चेंडूवर बाऊंड्री मारली.
अभिषेक शर्माने षटकार मारल्यानंतर शाहीन आफ्रिदी संतापला आणि डोळे वटारून काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर पुढच्या षटकात जेव्हा आफ्रिदी गोलंदाजीला आला, तेव्हा त्याच्यासमोर उपकर्णधार शुभमन गिल उभा होता. सुरुवातीला आफ्रिदीने त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण ते फार काळ चालले नाही. गिलने शाहीनच्या चौथ्या आणि सहाव्या चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवले. चौकार मारल्यानंतर गिलने शाहीनसमोर चेंडू सीमारेषेपार गेल्याचा इशारा केला.
इतकेच नाही, तर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्यासमोर जेव्हा हॅरिस रौफ गोलंदाजीला आला, तेव्हाही असेच दृश्य पाहायला मिळाले. रौफने अभिषेकला चेंडू टाकून डिवचण्याचा प्रयत्न केला, पण त्यानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, अभिषेकला चेंडू सीमारेषेबाहेर पाठवता आला नाही, पण जेव्हा शुभमन त्याच्यासमोर आला, तेव्हा त्याने रौफला सरळ दिशेने शानदार चौकार लगावला. त्यानंतर अभिषेकने हॅरिसला काहीतरी म्हटले आणि दोघांमध्ये वाद झाला. प्रकरण अधिक चिघळण्याआधीच, तेथे उभ्या असलेल्या पंचांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.
अभिषेक आणि गिलने या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. दोघांनी मिळून ५९ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी केली, जी पाकिस्तानविरुद्ध टी-२० मध्ये सलामीच्या जोडीची सर्वात मोठी भागीदारी आहे. शुभमन २८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ४७ धावा करून बाद झाला, पण अभिषेकने पाकिस्तानी गोलंदाजांना सोडले नाही. त्याने ३९ चेंडूंत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या.