
Asia Cup 2025 Ind vs Pak : आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. सुपर फोरच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी निवडली. हार्दिक पांड्याने भारतासाठी नवीन चेंडू घेतला. पांड्यासोबत नवीन चेंडूने गोलंदाजी करायला आलेल्या बुमराहचा सामना पाकचे सलामीवीर फखर जमान आणि साहिबजादा फरहान यांनी सहज केला. पाकिस्तानविरुद्धच्या गट सामन्यात बुमराहविरुद्ध दोन षटकार मारणारा साहिबजादा फरहानच यावेळीही बुमराहवर भारी पडला.
पॉवरप्लेमधील आपल्या पहिल्या षटकात ११ धावा दिल्यानंतर बुमराहने दुसऱ्या षटकात नो-बॉलसह १० धावा दिल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या बुमराहविरुद्ध साहिबजादा फरहानने दोन चौकारांसह १३ धावा काढल्या. पॉवरप्लेमध्ये फरहानने बुमराहविरुद्ध चार चौकार मारले, तर फखर जमाननेही बुमराहविरुद्ध दोन चौकार लगावले. पॉवरप्ले संपल्यानंतर बुमराहने तीन षटकांत ३४ धावा दिल्या होत्या.
बुमराहने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पॉवरप्लेमध्ये इतक्या धावा दिल्या. यापूर्वी २०१५ मध्ये त्याच्या दुसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन षटकांत ३१ धावा देणे ही त्याची सर्वात खराब गोलंदाजी कामगिरी होती. त्यानंतर २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन षटकांत २७ धावा, २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन षटकांत २६ धावा आणि २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन षटकांत २५ धावा देणे ही पॉवरप्लेमधील त्याची खराब कामगिरी होती. २०१७ नंतर कोणत्याही संघाने बुमराहविरुद्ध पॉवरप्लेमध्ये २५ पेक्षा जास्त धावा केल्या नव्हत्या.
याशिवाय, आपल्या शेवटच्या षटकात आणखी ११ धावा देऊन बुमराहने सामन्यात एकूण चार षटकांत ४५ धावा दिल्या. बुमराहच्या एका दशकाच्या टी२० कारकिर्दीतील ही तिसरी सर्वात खराब गोलंदाजी कामगिरी आहे. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार षटकांत ५० धावा देणे ही बुमराहच्या कारकिर्दीतील सर्वात खराब गोलंदाजी कामगिरी आहे. ७३ टी२० सामने खेळलेल्या बुमराहने आपल्या कारकिर्दीत फक्त पाच वेळा ४० पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. २०२४ च्या टी२० विश्वचषकानंतर बुमराह पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धेत भारताकडून खेळत आहे.