
Asia Cup 2025 India vs Pakistan : भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप २०२५ चा हायव्होल्टेज सामना रंगतदार वळणावर आला आहे. पाकिस्तानने २० षटकांत ५ गडी गमावत १७१ धावा केल्या असून, भारतासमोर आता १७२ धावांचं लक्ष्य आहे.
सामन्याच्या पहिल्याच टप्प्यात हार्दिक पांड्याने फखर झमानला (१५) बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर फिरकीपटू कुलदीप यादवने हुसेन तलत (१०) ला बाद करत दबाव कायम ठेवला. मात्र, पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फर्हानने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत डाव सावरला. शिवम दुबेनं त्याला अर्धशतकानंतर रोखत मोठा धक्का दिला. मोहम्मद नवाज रनआऊट झाल्यामुळे भारताला आणखी संधी मिळाली, तीही कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अचूक थ्रोमुळे.
तथापि, भारताच्या फिल्डिंगमध्ये आज अनेक त्रुटी स्पष्टपणे दिसून आल्या. संघाने तीन झेल सोडले, ज्यामुळे काही निर्णायक क्षण पाकिस्तानच्या बाजूने गेले. आशिया कप २०२५ मध्ये भारताची कॅचिंग इफिशियन्सी फक्त ७१.४% इतकी नोंदवली गेली आहे – जी श्रीलंका (६४.७%) आणि हाँगकाँग (५२.१%) यांच्यापेक्षा केवळ थोडीशीच चांगली आहे.
आता भारतापुढे १७२ धावांचं लक्ष्य आहे. फलंदाजांनी संयम आणि आक्रमकता यांचा योग्य समतोल राखत सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरायला हवं.