
दुबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना क्रिकेट चाहत्यांसाठी एक मेजवानी ठरला! सुरुवातीला अडचणीत सापडलेल्या भारताने तिलक वर्माच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर सामन्यावर पकड मिळवली आणि पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत नवव्यांदा आशिया कपचं विजेतेपद पटकावलं.
पाकिस्तानने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १४६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताची सुरुवात खराब झाली. अवघ्या २० धावांत भारताने आपले तीन प्रमुख फलंदाज गमावले अभिषेक शर्मा (5), शुबमन गिल (12), आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (0).
पण यानंतर मैदानात उतरलेल्या तिलक वर्माने जबरदस्त संयम दाखवत ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा फटकावत भारताला संकटातून बाहेर काढलं. त्याला संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांची उत्तम साथ मिळाली.
हार्दिक पांड्या दुखापतीमुळे अंतिम सामन्याला मुकला, आणि त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या रिंकू सिंगने विजयी धाव घेऊन सामन्याची सांगता केली, तो क्षण लाखमोलाचा ठरला!
पाकिस्तान: 146/9 (20 षटकं)
भारत: 150/5 (19.5 षटकं)
तिलक वर्मा: नाबाद 69 (Player of the Match)
या ऐतिहासिक विजयाने भारताने पुन्हा एकदा आशिया खंडात आपली क्रिकेट बादशाही सिद्ध केली आहे.