India vs Pakistan Asia Cup Final : पाकिस्तानला हरवून भारताने आशिया कपवर नाव कोरले!

Published : Sep 28, 2025, 10:10 PM ISTUpdated : Sep 29, 2025, 12:21 AM IST
India Beats Pakistan Asia Cup 2025 Final

सार

India vs Pakistan Asia Cup Final: आशिया चषक फायनलमध्ये भारतासमोर पाकिस्तानचा संघ १४७ धावांवर सर्वबाद झाला. भारताची सुरवात संथ झाली. काही विकेट्स लवकर गमावल्या. पण अखेर भारताने विजयश्री खेचून आणला.

दुबई : पाकिस्तानचा पराभव करून भारताने आशिया चषक २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. तिलक वर्मा याने एकट्याने किल्ला लढवत टीम इंडियाला हा किताब मिळवून दिला. पाकिस्तानने विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारतीय संघाने ५ गडी गमावून पूर्ण केले. तिलक शेवटपर्यंत क्रीझवर टिकून राहिला आणि त्याने ५३ चेंडूंमध्ये ६९ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त, शिवम दुबेने २२ चेंडूंमध्ये ३३ आणि संजू सॅमसनने २४ धावांचे योगदान दिले. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडिया अजिंक्य राहिली.

आशिया चषक फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताला विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानला भारतीय फिरकी गोलंदाजांनी रोखले. पाकिस्तानचा संघ १९.१ षटकांत सर्वबाद झाला. कुलदीप यादवने भारतासाठी चार विकेट्स घेतल्या. त्याने चार षटकांत फक्त ३० धावा दिल्या. वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ३८ चेंडूत ५७ धावा करणारा साहिबजादा फरहान पाकिस्तानचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. फखर जमानने ३५ चेंडूत ४६ धावा केल्या. इतर कोणालाही विशेष कामगिरी करता आली नाही.

पहिल्या विकेटसाठी फरहान-जमान जोडीने ८४ धावांची केली भागीदारी

पाकिस्तानची सुरुवात दमदार झाली होती. पहिल्या विकेटसाठी फरहान-जमान जोडीने ८४ धावांची भागीदारी केली. भारताला ही भागीदारी तोडण्यासाठी दहाव्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. फरहानला बाद करून वरुण चक्रवर्तीने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सईम अय्युब (१४) आणि जमान यांनी २९ धावांची भागीदारी केली. पण तेराव्या षटकात कुलदीपने अय्युबला बाद केले. अय्युब बाद झाला तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या दोन गडी बाद ११३ होती.

पाकिस्तानच्या डावाला लागली गळती 

त्यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळती लागली. अवघ्या ३४ धावांत पाकिस्तानने नऊ विकेट्स गमावल्या. अय्युबशिवाय कुलदीपने सलमान आगा (८), शाहीन आफ्रिदी (०) आणि फहीम अश्रफ (०) यांनाही बाद केले. शेवटच्या षटकांमध्ये मोहम्मद नवाज (६) आणि हॅरिस रौफ (६) यांना बाद करून जसप्रीत बुमराहने पाकिस्तानचा डाव संपवला.

या सामन्यासाठी भारताने संघात तीन बदल केले होते. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या जागी रिंकू सिंगला संघात स्थान मिळाले. शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह यांचेही संघात पुनरागमन झाले. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना वगळण्यात आले. पाकिस्तानने संघात कोणताही बदल केला नाही. दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे:

भारत: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

पाकिस्तान: साहिबजादा फरहान, फखर जमान, सईम अय्युब, सलमान आगा (कर्णधार), हुसेन तलत, मोहम्मद हॅरिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, अबरार अहमद.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

मुंबईच्या पराभवानंतर रोहितचा मोठा निर्णय, मुश्ताक अली T20 क्रिकेटमध्ये परतणार!
स्मृतीच्या भावाने सत्यच सांगून टाकलं, स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाची तारीख ठरली?