
मुंबई : केंद्र सरकारच्या महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबतचा मुद्दा पुन्हा तापला आहे. पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) काही अटींसह या विधेयकाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या संकेतांमुळे INDIA आघाडीतील भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. आज दुपारी सुप्रिया सुळे पत्रकार परिषदही घेणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेदरम्यान लोकसभा आणि विधानसभांमधील जागांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव स्वीकारला गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, मतदारसंघ पुनर्रचनेबाबत सर्वपक्षीय बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि डीएमके यांच्याकडूनही काही मुद्द्यांवर सहमती दर्शवण्यात आली. त्यामुळे आगामी अधिवेशनात या विधेयकावर विरोधकांची भूमिका बदलू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी झालेल्या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला INDIA आघाडीतील प्रमुख पक्षांनी एकत्रित विरोध केला होता. या विधेयकांमुळे लोकशाहीतील समतोल बिघडू शकतो, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र आता काही पक्षांनी भूमिका मवाळ केल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच INDIA आघाडीतील एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.