Published : Aug 10, 2025, 12:30 AM ISTUpdated : Aug 10, 2025, 12:43 AM IST
मुंबई - विकेंडला सरत्या आठवड्याचा घेतलेला आढावा. फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे केलेले नियोजन, शिंदेंनी दिल्ली दौर्यात विस्तार हाणून पाडला, दादरचा कबुतरखाना गाजला तर पवारांनी नागपूरचे मैदान मारले. वाचा सविस्तर नेमके पडद्यामागे काय घडले.
दादरच्या कबुतरखान्याचा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे ते वारंवार महापालिकेकडे याची तक्रार करतात. या कबुतरखान्याच्या शेजारी जैन मंदिर आहे. येथील गुजराती आणि जैन समाजाचे नागरिक कबुतरांना खाद्य टाकतात. यावेळी महापालिकेने कारवाई करत कबुतरखान्याला ताडपत्री लावली. आधीच विलेपार्लेतील जैन मंदिरावर करण्यात आलेल्या पाडकामामुळे संतप्त असलेला जैन समाज या कारवाईमुळे आणखी संतप्त झाला. या समाजाने राज्य सरकारवर दबाव आणला. त्यामुळे सरकारने कबुतरखान्यावरील कारवाई मागे घेतली. पण एवढ्याने हे प्रकरण थांबले नाही. राज्य सरकारने कारवाई मागे घेतल्याचे सांगितल्यावर मोठ्या संख्येने जैन बांधव या परिसरात गोळा झाले. त्यांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री काढत कबुतरांना खाद्य दिले. यामुळे आता या कबुतखान्यावरुन मराठी आणि जैन व गुजराती आमने सामने आले आहेत.
25
देवाभाऊंचा मंत्रिमंडळ विस्तार
देवाभाऊंनी या आठवड्यात शिंदे आणि अजित पवार यांच्यावर चांगलाच सर्जिकल स्ट्राईक केला आहे. एकिकडे मंत्रिमंडळ विस्ताराचे नियोजन करत शिंदेंच्या मंत्र्यांना डच्चू देण्याचे पक्के केले होते. तर दुसरीकडे अजित पवारांच्या पुण्यात जाऊन या शहरात दादागिरी सुरु असल्याने विकास होत नसल्याचे सांगत दादांना थेट आव्हान दिले. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी देवाभाऊंनी राज्यपालांची भेटही घेतली होती. पण माशी शिंकली आणि हा विस्तार सध्या थंडबस्त्यात पडला आहे. पण देवाभाऊंनी तलवार कधी चालेल ते सांगता येत नाही.
35
शिंदेंचा दिल्ली दौरा
देवाभाऊंनी मंत्रिमंडळ विस्ताराचे नियोजन करुन शिंदेंच्या महत्त्वाच्या मंत्र्यांना घरी बसवण्याचे जवळपास पक्के केले होते. पण शिंदे यांनी लगेच दिल्ली गाठत यावर व्हेटो आणला. त्यांनी अमित शहा यांना या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली. आणि विस्तार सध्या तरी लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे. यावेळी त्यांनी शहा यांच्याप्रमाणेच मोदींची सहकुटुंब भेट घेतली. आता शिंदेंच्या मंत्र्यांच्या मानेवर असलेली टांगती तलवार किती दिवस शांत राहते हे बघण्यासारखे आहे. कारण देवाभाऊंनी एकदा मनात आणले, की ते झाल्याशिवाय राहत नाही असे राजकीय जाणकार सांगतात.
राहुल गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी सर्वपक्षिय बैठक बोलविली होती. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उपस्थितांमध्ये शेवटच्या रांगेत बसले होते. याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला. शिंदे सेनेने ठाकरेंवर चांगलाच प्रहार केला. ठाकरेंना अपमानास्पद वागणूक देण्यात आली हे महाराष्ट्रासमोर आणले. परंतु, काही वर्षांपूर्वी शिंदेंचाही एक असाच फोटो व्हायरल झाला होता. तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते. पंतप्रधानांनी बोलवलेल्या बैठकीत त्यांना इतर मुख्यमंत्र्यांच्या मागे उभे करण्यात आले होते. तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देण्यात येते असे ठाकरे सेनेने महाराष्ट्रासमोर आणले होते.
55
पवारांचा झंझावाती नागपूर दौरा
शरद पवार यांनी देवाभाऊंच्या होमग्राऊंडवर ओबीसींच्या जागरासाठी मंडल यात्रा काढली. तिला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशीच ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा टॅग काही काळ ट्विटरवर ट्रेड करत होता. त्यानंतर लगेच देवाभाऊंचा टॅग ट्रेंड करायला लागला. देवाभाऊंनी बहिणींना कशी मदत केली. हे त्यावर टॅगवर बिंबवण्यात आले होते. पवारांच्या या दौऱ्याने पुन्हा एकदा देवाभाऊंच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण नागपुरकर आणि विदर्भवादी जनता कोणाला कधी उंचावले आणि कधी कोणाला धक्का देईल हे सांगता येत नाही.