
Weather Update : जानेवारी महिन्यात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून, आता मकर संक्रांतीच्या सणालाही पावसाची साथ मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काही दिवसांत राज्यातील हवामान कसे राहणार, याबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळपासून मुंबईत ढगांची दाटी दिसून आली. रात्री आणि पहाटे थंडावा जाणवत असला, तरी दुपारच्या सुमारास उकाडा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवार, 13 जानेवारी रोजी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहरात कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 18 ते 22 अंश सेल्सियस दरम्यान राहू शकते.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण भारतात सुरू झालेल्या पावसाचा प्रभाव आता पश्चिम महाराष्ट्रात दिसून येत आहे. सोमवारी कोल्हापूरमध्ये दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. यासोबतच सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली असली, तरी मराठवाडा आणि विदर्भात गारठ्याचा प्रभाव अजूनही कायम आहे. जालना, बीड, लातूर, परभणीसह अनेक जिल्ह्यांत मंगळवारी सकाळी दाट धुक्याचे चित्र पाहायला मिळाले. या भागांत किमान तापमान 8 ते 14 अंश सेल्सियसपर्यंत घसरण्याची शक्यता असून, कमाल तापमान 27 ते 31 अंश सेल्सियस दरम्यान राहू शकते.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 16 जानेवारीपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर यांसह पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण तसेच महापालिका निवडणुकांच्या काळात नागरिकांना ढगाळ आणि पावसाळी वातावरणाचा सामना करावा लागू शकतो.