विशाखा राऊत थेट कोर्टात; जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान

Published : Aug 31, 2026, 06:11 PM IST
Vishakha Raut

सार

विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवल्याने त्यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार आहे. या निर्णयाविरोधात राऊत यांनी न्यायालयात अपील दाखल केले आहे

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर आले आहे. पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने विशाखा राऊत जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. यावरुन आता विशाखा राऊत यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, त्यांच्या विरोधातील सरवणकर बापलेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत विशाखा राऊत यांच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

जात प्रमाणपत्र रद्द; विशाखा राऊत यांची कायदेशीर लढाई

ठाकरे सेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि मुंबई महापालिकेतील आक्रमक चेहरा म्हणून विशाखा राऊत यांची ओळख आहे. पण विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जात प्रमाणपत्राच्या निर्णयाविरोधात विशाखा राऊत यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. कोकण विभागीय आयुक्तांकडे अपील केल्यानंतर आता त्यांनी न्यायालयातही अपील दाखल केले आहे. त्यामुळे नगरसेवक पद वाचवण्यासाठी राऊत यांची कायदेशीर धावपळ सुरू झाली आहे.

नगरसेवक पदावर टांगती तलवार

ठराविक मुदतीत जात पडताळणी समितीकडून वैध प्रमाणपत्र मिळाले नाही, तर महापालिका सभागृहात राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत कोणत्याही क्षणी निर्णय होऊ शकतो. त्यामुळे जात प्रमाणपत्राचा हा मुद्दा त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे.

दरम्यान, त्यांच्या विरोधात असलेल्या सरवणकर बापलेकांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन विशाखा राऊत यांच्याशी संबंधित लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

सरवणकर बापलेकांची शिंदेंसोबत भेट

विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर प्रिया सरवणकर आणि सदा सरवणकर यांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ४० ते ४५ मिनिटे चर्चा झाली. या भेटीत विशाखा राऊत यांच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती सरवणकर यांनी शिंदे यांच्याकडे केली होती.

‘माझं प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दबाव’

दरम्यान, सरवणकर कुटुंबीयांच्या भूमिकेवर विशाखा राऊत यांनीही सवाल उपस्थित केला आहे. विजयी उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास मुंबई महापालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. त्यामुळे ‘माझी मुलगी नगरसेवक होणार आहे’, असे सदा सरवणकर यांनी महिनाभरापूर्वीच कसे सांगितले, असा सवाल विशाखा राऊत यांनी केला. ‘त्यांना हे आधीच कसे माहीत पडले? त्यांना काय स्वप्न पडले होते का?’ असा सवाल करत राऊत यांनी सरवणकरांना लक्ष्य केले. तसेच आपले जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अधिकाऱ्यांवर मोठा दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आता जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात विशाखा राऊत यांनी न्यायालयीन लढाई सुरू केल्याने त्यांच्या नगरसेवक पदाबाबत पुढे काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Accident : वांद्र्यात महिलेच्या गाडीखाली चिरडून ८ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Weather Update : सरासरीपेक्षा कमी पाऊस, मात्र ऑगस्टच्या अखेरीस वातावरणात बदल; काय आहे पावसाची स्थिती? IMDची माहिती