
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मुंबईत तसंच राज्यभरातील विविध भागात पावसाने दडी मारली आहे. हवामान विभागाने अद्यापही मुसळधार पावसाचा अंदाज संपूर्ण राज्यभरात वर्तवलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कुठे, कसा आहे पावसाची स्थिती?
वायव्य बंगालचा उपसागर आणि त्याला लागून असलेल्या पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशा किनारपट्टीवरील कमी दाबाचं क्षेत्र (त्याशी संबंधित चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीसह) आज सकाळी ०५:३० वाजता त्याच भागात कायम होतं. पुढील २४ तासांत हे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची आणि उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या गंगा-खोऱ्याच्या (GWB) भागातून पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने विदर्भात काहीसं पावसाचं वातावरण असेल. हवामान विभागाने विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे. गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर इतर विदर्भात पावासची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
दुसरीकडे कोकणात आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापुरात हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापुरा मध्यम पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगरात, हिंगोलीत आणि नांदेडमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अनेक भागात ढगाळ वातावरण राहील.
राज्यभरात पाऊस सरासरीपेक्षा कमी
दरम्यान, राज्यभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रभरातील अनेक भागात पावसाची उघडीप आहे. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे, मात्र अद्याप हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली नाही. पावसाची तूट असल्याने बळीराजा चिंतेत आहे. कमी पावसाचा शेतीवर मोठा परिणाम होण्याचीही चिंता आहे. आता जून, जुलै आणि ऑगस्ट महिनादेखील संपला असून तीन महिन्यात पावासाने सरासरीदेखील गाठलेली नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाची कशी स्थिती असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.