
मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. एका महिलेने चालवलेल्या गाडीखाली आल्याने अंश नावाच्या ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघात घडल्यानंतर, मेघना रावळ नावाच्या या महिलेने स्वतः मुलाला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
ANI शी बोलताना अंशचे वडील अरविंद गुप्ता यांनी आपल्या मुलासाठी न्यायाची मागणी केली आहे. ते म्हणाले, "माझ्या मुलाचं नाव अंश होतं. त्याच्यासोबत जे झालं, त्यासाठी मला न्याय हवाय. तो माझा एकुलता एक मुलगा होता... त्याला माझ्यापासून हिसकावून घेतलं. मी आता काय करू? मला फक्त न्याय हवाय, बस्स... माझी मुलगीही तिथे रडत आहे... मला काहीच माहित नव्हतं, मला एक मेसेज आला आणि सांगितलं की माझ्या मुलाचा अपघात झालाय. मी इथे आलो, तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की अपघात झाला आहे."
दरम्यान, मुंबई पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं आहे. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.