
Mumbai Local : पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या १५ डबा जलद लोकलने भाईंदर स्थानकाचा नियोजित थांबा चुकवला. ही लोकल तब्बल दोन किलोमीटर पुढे जाऊन थांबल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आणि काही काळ स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याबद्दलचे वृत्त महाराष्ट्र टाइम्स यांनी दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी विरारहून दादरकडे निघालेल्या या लोकलला वसई रोड, भाईंदर, दहिसर, अंधेरी आणि दादर असे थांबे होते. वसई रोड स्थानकानंतर लोकल वेगाने धावत असताना मोटरमनच्या लक्षात न येता भाईंदरचा थांबा चुकला. चूक लक्षात येताच लोकल थांबवण्यात आली, मात्र तोपर्यंत स्थानक बरेच मागे गेले होते.
लोकल स्थानकापुढे थांबल्यानंतर अनेक प्रवाशांनी थेट रुळांवर उतरून पायपीट करत भाईंदर स्थानक गाठले. ही घटना अत्यंत धोकादायक असून रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे.
दरम्यान, भाईंदर स्थानकावर जलद लोकलची वाट पाहत असलेले प्रवासी आधीच नाराज होते. जलद लोकल न थांबल्याने संतापलेल्या प्रवाशांनी विरार-चर्चगेट एसी लोकल काही काळ रोखून धरली. “आमच्याकडे एसी लोकलचा पास नाही, पण वेळेवर कामावर पोहोचणे गरजेचे आहे,” अशी भूमिका प्रवाशांनी मांडली.
परिस्थिती तणावपूर्ण होताच रेल्वे प्रशासनाने हस्तक्षेप केला. अखेर प्रवाशांना एसी जलद लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि गाड्यांची वाहतूक सुरळीत झाली.
या संपूर्ण प्रकाराची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने विरार-दादर १५ डबा लोकलने भाईंदर थांबा का चुकवला, याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.