
मुंबई : दादर येथील शिवाजी पार्कमध्ये आज ठाकरे बंधुंकडून तिरंगा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी १० वाजल्यापासून शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत शांततेत रॅली पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नीट परीक्षेच्या पेपरफुटीनंतर ज्या २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच जेन-झीने कशाप्रकारे सरकारच्या झिंज्या उपटल्या, अशा शब्दांत विद्यार्थ्यांचं यशस्वी आंदोलनाबाबत अभिनंदन केलं. शिवाय उद्धव ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं, असं सांगत नितीन गडकरी, निर्मला सितारमण यांचा उल्लेख करत मोदी सरकारवर टीका केली.
तिरंगा रॅलीतील भाषणात उद्धव ठाकरे काय म्हणाले?
'आज मी केवळ अभिनंदन करत नाही, तर देशातील तमाम देशभक्तांना अभिवादन करतो आहे. आज कोणतीही निवडणूक कोणीही जिंकलेलं नाही, पण अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकलेले आहेत. ही संघर्षाची सुरुवात झाली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. या संघर्षात सर्वजण जात, पात, धर्म, पक्ष विसरुन होय मी भारतीय आहे, देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झाला आहात. एका झुरळाने हुकूमशाहला झुकवलं आहे. हा खरं विष्णूचा अवतार आहे', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं, तरुणांचं अभिनंदन केलं.
पुढे ते म्हणाले, 'मोदींना सांगायचं आहे, की मोदीजी आता तरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यात व्यग्र आहेत, आता त्यांना सांगा देशाचं काम करा. कारण अर्थमंत्री निर्माला सितारमण घसरत्या रुपयाबाबत बोलत नाही, महागाईबद्दल बोलत नाही, पण त्या पेपरफुटीचे फायदे सांगतात. राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री आहेत, पण देशाच्या संरक्षणाची बोंब आहे, पण राजनाथ सिंह धर्मेंद्र प्रधानांच्या संरक्षणासाठी पुढे आले होते', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारमधील मंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं.
उद्धव ठाकरे भाषणात पुढे बोलताना, नितीन गडकरी यांचा उल्लेख 'खड्डा मंत्री' असा केला. 'आपले 'खड्डा मंत्री',...नाही... रस्ता मंत्री इथेनॉलवर बोलतात', असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रासह देशभरातील रस्त्यांची स्थिती, तसंच सध्या देशभरात असलेल्या इथेनॉलच्या वापराबाबत टीका केली.
'मला मोदींना सांगायचं आहे, की धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिमंडळातून काढताना तुम्हाला किती यातना झाल्या, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक यातना आपण ज्या आत्महत्या केलेल्या मुलांना आता श्रद्धांजली दिली, त्या मुलांच्या कुटुंबियांना यातना झाल्या आहेत. या यातना आम्ही कधीच विसरू शकत नाही, विसरणार नाही. आता देशभर ठिणगी पडली आहे, देशभर वणवा पेटला आहे. आम्हाला आता विचारतात की निवडणूका लांब आहेत, निवडणुकांना अजून तीन वर्ष आहेत. पण निवडणुका गेल्या खड्ड्यात... कारण मोदींनी आता हे पाहिलं आहे, की मतं चोरी करता येतात, पण माणसं चोरता येत नाही, मनं चोरता येत नाहीत. मनं आता पेटलेली आहे, पिसाळलेली आहेत. ही ठिणगी आता आपल्याला जागती ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे', अशा सडेतोड शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांचा समाचार घेतला आहे.