
मुंबई : मुंबईतील दादर शिवाजी पार्क इथे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली तिरंगा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने तरुण हजर होते. ठाकरे बंधुंनी आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा देत तरुणांनी शिवाजी पार्कवर हातात तिरंगा घेत मोर्चासाठी गर्दी केली होती. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी तरुणांशी संवाद साधला.
राज ठाकरे काय म्हणाले?
'आजचा दिवस भाषण करण्याचा दिवस नव्हे, विजय आंदोलनालसाठी जमले आहात, जे विजय आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलंत, पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं, त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे हजर आहात. देशातले जेन-झी हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातून कळलं, परंतु आज अतिशय महत्त्वाची गोष्ट नमूद करणं आवश्यक आहे. आज नीटच्या परीक्षा, पेपरफुटीचं आंदोलन आणि त्यानंतर देशभरातल्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या २१ विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केली. यानंतर झालेल्या आंदोलनाला यश आलं आहे. इथे उत्साह साजरा करूच, पण आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मिनिटं मौन धारण करू, शांत उभे राहू', असं म्हणत राज ठाकरेंसह संपूर्ण सभेत आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राज ठाकरे यांनी सभेत नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांनी नावंही सांगितली -
प्रदीप मेघवाल - राजस्थान
रितीक मिश्रा - उत्तर प्रदेश
सिद्धार्थ हेगडे - गोवा
भाग्यश्री - कर्नाटक
अंशिका पांडे - दिल्ली
उमेश माळी - राजस्थान
रेणू मिरा - राजस्थान
रिया कुमार थापा - उत्तराखंड
शिवानी यादव - उत्तर प्रदेश
अनुकिर्तना - तमिळनाडू
पटेल - गुजरात
आकांक्षा चक्रवर्ती - मध्य प्रदेश
रिमा बेगम - आसाम
मैथिली सोनावणे - महाराष्ट्र
अवंतिका मौर्य - मध्य प्रदेश
यतिन कुमार - उत्तर प्रदेश
गोपिका - तमिळनाडू
शेख सना - तेलंगणा
खान - तमिळनाडू
सिमरन - हरियाणा
रोशनी - तमिळनाडू
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
'आज मी केवळ अभिनंदन करत नाही, तर देशातील तमाम देशभक्तांना अभिवादन करतो आहे. आज कोणतीही निवडणूक कोणीही जिंकलेलं नाही, पण अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकलेले आहेत. ही संघर्षाची सुरुवात झाली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. या संघर्षात सर्वजण जात, पात, धर्म, पक्ष विसरुन होय मी भारतीय आहे, देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झाला आहात. एका झुरळाने हुकूमशाहला झुकवलं आहे. हा खरं विष्णूचा अवतार आहे. मोदींना सांगायचं आहे, की मोदीजी आता तरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यात बिझी आहेत, त्यांना सांगा आता देशाचं काम करा. कारण अर्थमंत्री निर्माला सितारमण घसरत्या रुपयाबाबत बोलत नाही, महागाईबद्दल बोलत नाही, पण पेपरफुटीचे फायदे सांगतात. राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानांच्या संरक्षणासाठी पुढे आले होते. आपले 'खड्डा मंत्री', रस्ता मंत्री इथेनॉलवर बोलतात.'
'मोदींना सांगायचं आहे, की धर्मेंद्र यांना मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्यापेक्षा कितीतरी यातना आपण ज्यांना आता श्रद्धांजली दिली, त्या मुलांच्या कुटुंबियांना झाल्या आहेत. या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. फक्त एकच विषय आता देशभर ठिणगी पडली आहे, देशभर वणवा पेटला आहे. आता विचारतात आम्हाला निवडणुकांना तीन वर्ष आहेत. पण निवडणुका गेल्या खड्ड्यात... कारण मोदींनी पाहिलंय, मतं चोरी करता येते, पण माणसं चोरता येत नाही, मनं चोरता येत नाही, मनं आता पेटलेली आहे, पिसाळलेली आहेत. ही ठिणगी जागती ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे', अशा शब्दात भाजप, मोदी सरकारचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे.