Dadar Tiranga Morcha : ठाकरे बंधुंची अभिनंदन सभा, शिवाजी पार्कात तिरंगा हातात घेत जल्लोष; तरुणांची मोठी गर्दी

Published : Jul 26, 2026, 11:05 AM IST
Raj - Uddhav Thackeray

सार

Tiranga Morcha : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर रविवारी, २६ जुलै रोजी तिरंगा मोर्चाचं आयोजन केलं आहे. सकाळी १० वाजता दादरच्या शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत तिरंगा मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर आज २६ जुलै रोजी रविवारी मुंबईत तिरंगा मोर्चा निघणार असल्याचं ठाकरे बंधुंनी सांगितलं. 

शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिर तिरंगा मोर्चा

दादरच्या शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढला जात आहे. या मोर्चात विद्यार्थ्यांचं यश, त्यांच्या लढ्याला मिळालेलं यश याचा आनंद साजरा करण्यासाठी हा मोर्चा काढला जात असल्याचं ठाकरे बंधुंनी सांगितलं. विद्यार्थ्यांचा हा विजय साजरा करण्यासाठी रविवारी शिवाजी पार्कवर जमण्याचं आवाहन तरुणांना करण्यात आलं आहे. तसंच तिरंगा घेऊनच मोर्चासाठी येण्याचंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, आज रविवारी, २६ जुलै रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याविरोधात ठाकरे बंधु मोर्चा काढणार होते. मात्र त्याआधीच २५ जुलै रोजी, शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही मोर्चा निघेल, मात्र तो आनंदोस्तवाचा तिरंगा मोर्चा निघेल असं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

 

 

शिवाजी पार्कवर वीर सावरकर मार्गावर स्टेज उभारण्यात येईल. इथेच सर्वांनी २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता एकत्र यावं. शिवाजी पार्कवरुन विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष होणं गरजेचं आहे. हा तिरंगा मोर्चा अभिनंदन सभा म्हणून साजरा केला जाईल. हा मोर्चा शांततेच पार पडेल, या मोर्चामागे कोणताही राजकीय भाग किंवा हा मोर्चा राजकीय मोर्चा नाही. विद्यार्थी, तरुणांच्या भविष्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी काढण्यात येणारा तिरंगा मोर्चा आहे, असंही ठाकरे बंधुंनी सांगितलं.

दादर स्टेशन ते शिवाजी पार्क मोफत बाईक सेवा

महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या मोर्चासाठी दादर स्टेशन ते शिवाजी पार्क मोफत बाईक सेवा देण्यात येणार असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही विद्यार्थी, तरुणांचं अभिनंदन करत आनंदोत्सव, आपला विजय साजरा करण्यासाठी शिवाजी पार्कवर जमण्याचं आवाहन केलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Security Breach : PMO चे बनावट अधिकारी बनून मोदींच्या कार्यक्रमात घुसखोरी, बंदूकधारी अटकेत
Work From Home : ऑफिसमध्ये बसून जास्त काम होतं हा गैरसमज; तरुणीचा व्हिडिओ व्हायरल