Thane Water Cut: ठाणे शहरातील काही भागातही 5 जूनपासून 10 टक्के पाणी कपात लागू झाली आहे.
Thane Water Cut: पुरेशा पावसाअभावी जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने (TMC) पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. 10 टक्के पाणी कपात होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात लागू झाल्याने मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे शहरातील काही भागातही 5 जूनपासून 10 टक्के पाणी कपात लागू झाली आहे.
पाणी काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन
पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 2023 मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यामध्ये सुमारे 5.64 टक्के पाणीसाठा कमी आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.
कोणत्या भागात पाणीकपात होणार?
ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून 85 एमएलडी पाणी मिळते. या पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर 1, किसन नगर नं 1, किसन नगर नं 2, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं 1, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाणी पुरवठा केला जातो. याच भागात आता 10 टक्के पाणी कपात लागू झाली आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा असे नागरिकांना आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
आणखी वाचा :
JEE Advanced 2024 चा निकाल जाहीर, वेद लाहोटी 355 गुणांसह अव्वल