Thane Railway : ठाणे आणि मुलुंड दरम्यान रखडलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रेल्वे प्रशासन उचलणार असल्याची घोषणा केली आहे.
रेल्वेचा मोठा निर्णय! ठाणे-मुलुंड दरम्यान नवं स्टेशन
Thane Railway News : ठाणे आणि मुलुंड दरम्यान प्रस्तावित असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी संपूर्ण खर्च रेल्वे प्रशासन उचलणार असल्याची ठोस ग्वाही केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट दूरध्वनीवर चर्चा करून हा मोठा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे ठाणे-मुलुंड परिसरातील लाखो दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
25
अनेक वर्षांची मागणी अखेर मान्य
खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ठाणे व मुलुंड या दोन महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विद्यमान स्थानकांवरील प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी आणि परिसराचा वेगाने होत असलेला शहरी विस्तार पाहता नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. प्रकल्पाला मंजुरी मिळूनही विविध प्रशासकीय अडथळे आणि निधीअभावी काम रखडले होते.
35
स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू झालेला प्रकल्प थांबला
हा प्रकल्प स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आला होता. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत सुमारे 60 टक्के काम पूर्ण झाले होते. सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 120 कोटी रुपये इतका होता. मात्र, कालावधी वाढल्याने आणि बांधकाम खर्चात झालेल्या वाढीमुळे तो 245 कोटी रुपयांहून अधिक झाला. यावर्षी मार्चमध्ये स्मार्ट सिटी मिशनचा कालावधी संपल्यानंतर अतिरिक्त निधी मिळू न शकल्याने प्रकल्पाचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते.
या पार्श्वभूमीवर, हिवाळी अधिवेशनादरम्यान खासदार नरेश म्हस्के आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी लक्षात घेता, स्थानकाचे काम तातडीने सुरू करण्याची ठाम मागणी त्यांनी मांडली.
55
रेल्वे प्रशासनाने उचलली पूर्ण जबाबदारी
अखेर रेल्वे मंत्र्यांनी या रखडलेल्या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे घेण्याचा निर्णय घेतला. आवश्यक निधी रेल्वेकडूनच उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुलुंडजवळील नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे काम वेगाने पूर्ण होण्याची शक्यता असून, भविष्यात ठाणे-मुलुंड दरम्यानची रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत आणि सोयीची होणार आहे.