
मुंबई: मुंबईतील बेस्टच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील होत. राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'च्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. ठाकरे बंधूंची बेस्ट निवडणुकीत सपशेल फेल ठरली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला शून्य जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या उत्कर्ष पॅनलचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली असतानाच ठाकरे गट आणि मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. १८ ऑगस्ट रोजी पतपेढी निवडणुकीसाठी मतदान झालं होत.
मतमोजणीला पावसामुळे तीन ते चार तास विलंबाने सुरुवात झाली होती. बुधवारी पहाटे या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने सत्ता मिळवली आहे. त्यांच्या पॅनलने २१ पैकी तब्बल १४ जागांवर विजय मिळवला आहे. साद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले. यामध्ये भाजपचे 4, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2, तर एससी-एसटी युनियनचा एक उमेदवार विजयी झाला.
ठाकरे बंधूंना या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. 21 पैकी सर्वाधिक 19 जागा लढवणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकाही जागेवर खातं उघडता आलं नाही. राज ठाकरेंना या निवडणुकीत भोपळा फोडता आला नाही. या निवडणुकीमुळे ठाकरेंनी ९ वर्षांपासून असलेली सत्ता गमावली आहे. दोघांनी एकही जागा न मिळवल्यामुळे त्यांच्या युतीबद्दल अडचणी निर्माण झाल्या आहेत.