Sunday Mega Block : रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार असून अनेक लोकल सेवा रद्द किंवा वळवण्यात येणार आहेत. देखभाल कामांमुळे प्रवासावर परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी अधिकृत वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.
मुंबईकर लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, याचा थेट परिणाम लोकल सेवांवर होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रवासाचे नियोजन वेळापत्रक पाहून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
25
मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 या वेळेत असेल. या कालावधीत सीएसएमटीहून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान त्यांच्या नेहमीच्या थांब्यांवर थांबतील.
35
अप मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर वळणार
ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड स्थानकात अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान सर्व निर्धारित स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा अप जलद मार्गावर धावतील. त्यामुळे प्रवासाचा कालावधी काहीसा वाढण्याची शक्यता आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 दरम्यान ब्लॉक असणार आहे. याच कालावधीत अप हार्बर मार्गावरील वाहतूक सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान पूर्णपणे बंद राहणार आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या तसेच वांद्रे आणि गोरेगावकडे जाणाऱ्या अनेक डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
55
प्रवाशांसाठी विशेष लोकल सेवा
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. मात्र, गर्दी आणि वेळेचा अंदाज घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.