''..तर मोदी, शहांना अटक झाली असती, बाळासाहेबांनी वाचवले,'' राऊतांच्या पुस्तकात गौप्यस्फोट

Published : May 16, 2025, 02:17 PM ISTUpdated : May 16, 2025, 02:20 PM IST
Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut (Photo/ANI)

सार

खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शरद पवार, राज ठाकरे यांच्याबाबत गोपनिय माहिती पुढे आली आहे. 

मुंबई - ठाकरे गटाचे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या तुरुंगातील अनुभवांवर आधारित आत्मकथनात्मक पुस्तक ‘नरकातला स्वर्ग’ याचा प्रकाशन सोहळा उद्या शनिवारी होणार असला तरी, त्यातील खळबळजनक खुलास्यांनी आधीच राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

या पुस्तकात राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे भूतकाळातील गुंतागुंतीचे प्रसंग उघड केले आहेत. गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी हे आरोपी होते आणि अमित शहा यांच्यावर हत्या प्रकरणात आरोप होते, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची 'चौकटीबाहेरची मदत'

राऊत यांच्या मते, युपीए सरकारच्या काळात मोदी आणि शहा यांच्यावर अटक होण्याची शक्यता होती. मात्र, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन त्यांना मदत केली.

ते लिहितात, "बाळासाहेबांनी तत्त्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या फोनवरून एका महत्त्वाच्या व्यक्तीला फोन केला आणि सांगितलं – ‘तुम्ही कुठल्याही पदावर असाल, पण हिंदू आहात हे विसरू नका’. त्या एका फोनमुळे अमित शहा यांच्या अडचणी दूर झाल्या."

अमित शहा आणि जय शहा मुंबईत आले होते भेटीसाठी

राऊत लिहितात की, अमित शहा आपल्या लहानग्या मुलगा जय शहा यांना घेऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. तेव्हा बाळासाहेबांना मदतीसाठी याचना करण्यात आली होती. हा प्रसंग बाळासाहेबांच्या राजकीय वजनाचे आणि त्यांच्या हिंदुत्ववादी प्रभावाचे निदर्शक ठरतो.

‘हे तुरुंगातल्या भिंतीशी बोलल्यासारखं आहे’, संजय राऊत

पुस्तकाच्या अनुषंगाने राऊत म्हणाले, "मी याला गौप्यस्फोट म्हणत नाही. हे माझे तुरुंगातील अनुभव आहेत. तुरुंगातील भिंतीशी मी जे बोलत होतो, तेच लिहिलं आहे. अनेक गोष्टी मी अनुभवल्या, पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. राजकारणात अनेक बड्या व्यक्तींमधील संवाद, मदतीचे धागे मी जवळून पाहिले."

त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, "मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त आहे. मी अजूनही बरेच काही लिहू शकलो असतो."

राज ठाकरे यांचा उल्लेख, 'फोन जरी केला असता तर...'

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचाही अप्रत्यक्ष उल्लेख केला आणि म्हटलं, "आमच्या कुटुंबावर डोंगर कोसळला होता. राज ठाकरे यांनी फक्त एक फोन केला असता, तरी आधार वाटला असता." हा उल्लेख ठाकरे घराण्याच्या आतल्या नात्यांमधील ताणतणावांवर प्रकाश टाकतो.

‘नरकातला स्वर्ग’, राजकीय वर्तुळातील अपेक्षित भूकंप

संजय राऊतांचे हे पुस्तक केवळ तुरुंगातील अनुभवापुरते मर्यादित नसून, महाराष्ट्र व केंद्रातील राजकारणातील अनेक अनकाही गोष्टींना उजाळा देतं. यामध्ये मोदी-शहा यांच्यावरील आरोप, बाळासाहेबांचा प्रभाव, शरद पवार यांची भूमिका, राजकीय सत्तेतील व्यवहार, आणि राऊत यांचे वैयक्तिक अनुभव या सर्वांचा समावेश आहे.

‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक एक राजकीय दस्तऐवज ठरण्याची शक्यता आहे, जे पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात नवे वादंग उभे करू शकते. आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल की मोदी-शहा किंवा भाजपकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया येते का.

PREV

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!